औरंगाबाद- बीड जिल्ह्यातील गेवराई येथील तहसीलदार सचिन खाडे यांच्याविरुद्ध विनापरवाना घरात प्रवेश केल्याप्रकरणातील तीन दाखल गुन्हे रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. एम. देशपांडे व न्या. संदीपकुमार माेरे यांंनी गुरुवारी दिले. याप्रकरणात खाडे यांनी ऍड. सिद्धेश्वर ठाेंबरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली हाेती.
याचिकेनुसार गेवराईचे तहसीलदार असलेले सचिन खाडे यांच्याविराेधात १८ फेब्रुवारी राेजी विनापरवाना घरात प्रवेश केल्याप्रकरणात गेवराईत गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. ज्यांनी गुन्हा दाखल केला त्यांच्या नातेवाईकांवर आदल्या दिवशी खाडे यांनी वाळू चाेरीसंदर्भात व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणात साेमनाथ गिर्गे व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला हाेता. धमकी देणे आणि तहसीलदारांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्नही केला गेला हाेता, असेही दिलेल्या तक्रारीत म्हटले हाेते. त्याचा राग मनात ठेवून आराेपींच्या नातेवाईकांनी तहसीलदार खाडे यांच्याविरुद्ध विनापरवानगी घरात घुसल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला हाेता. या प्रकरणात गेवराई पाेलिसांनी बी समरी अहवालही दाखल करत असल्याचे सांगितल्यानंतर खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश देत तहसीलदार खाडे यांच्याविरुद्धचा गुन्हा रद्द केला.