बीड – रस्त्याच्या कडेला रात्री अपरात्री दबा धरून बसायचे,एखादा मालवाहू ट्रक आला की त्यावर चढायचे आणि चाकू, कटर च्यामाध्यमातून ट्रक ची ताडपत्री फाडायची अन माल चोरी करायचा .या पद्धतीने चोऱ्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केज पोलिसांनी केला आहे.चोरी करण्यासाठी हे चोर एकावर एक पाच सहा पॅन्ट घालायचे ज्यामुळे ट्रकमधून पडले तरी त्यांना इजा होत नव्हती .
मागील अनेक दिवसांपासून केज तालुक्यातील शिंदी फाटा ते कोरेगाव दरम्यान चालत्या वाहनावर चढून धारदार शस्त्राने ताडपत्री फाडून विविध वस्तू चोरीच्या घटना घडत आहेत. याची दखल घेऊन केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्यापथकाने पहाटे 5 वाजल्यापासून चोरांना पकडण्यासाठी दरम्यान दबा धरून बसले होते. सकाळी 6 वाजेच्या दरम्यान पोलीस पथक चोरट्यांचा शोध घेत असताना केज-बीड महामार्गावर सावंतवाडी पाटीजवळ असलेल्या टोल नाक्यावर तीन जण दबा धरून बसलेले संशयितरित्या आढळून आले. पोलिसांना पाहताच ते तिघे पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग केला.
यावेळी पोलिसांनी महादेव कल्याण पवार , सुंदर चंदर पवार या दोघांना ताब्यात घेतले तर बबन कल्याण पवार हा पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलीस नाईक दिलीप गित्ते यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात गु. र. नं.१२६/२०२२ भा. दं. वि. ४०१ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.