बीड – बीडच्या पुरवठा विभागातून गायब झालेल्या पाच हजार रेशन कार्ड प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हे प्रकरण आ संदिप क्षीरसागर यांनी विधानसभेत देखील लक्षवेधी द्वारे उचलले होते.आता विभागीय आयुक्त कार्यालयाकडून या प्रकरणात गंभीर दखल घेण्यात आली आहे.
बीडचे महसूल प्रशासन म्हणजे आंधळं दळतंय अन कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था झाली आहे.जिल्हा पुरवठा कार्यालयातून तब्बल वर्षभरापूर्वी पाच हजार पेक्षा अधिक रेशनकार्ड गायब झाले होते.हे प्रकरण आ संदिप क्षीरसागर यांनी विधानसभेत उपस्थित केले होते.त्यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी चौकशीचे आदेश दिले होते.
या नंतर विभागीय आयुक्त कार्यालयाने चौकशी सुरू केली.उपायुक्त वामन कदम यांनी केलेल्या चौकशीत ही रेशनकार्ड गायब झाल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान आता या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश उपायुक्त कदम यांनी दिले आहेत.त्यामुळे रेशनकार्ड गायब करणाऱ्या अधिकारी अन कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.