बीड – एक दोन दिवस अगोदर रेकी करायची,नंतर रात्री दोन ते चार च्या दरम्यान दोन स्कोर्पिओ मधून पेट्रोल पंपावर जायचे अन दररोज किमान एक हजार लिटर तरी डिझेल चोरायचे .हा दिनक्रम होता आठ ते दहा जणांचा.मात्र त्यांची ही चोरी अखेर उघडकीस आली अन सात चोरटे बीड पोलिसांच्या हातात अडकले.
पेट्रोल पंपालगत रात्रीच्या सुमारास उभ्या वाहनातील डिझेल कॅन्डमध्ये भरून चोरून नेणार्या परप्रांतीय टोळीचा बीड ग्रामीण पोलिसांनी भांडाभोड केला. जालना जिल्ह्यातील चंदनझिरा येथे या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ताब्यात घेतलेल्या सातही आरोपींना दि.13 एप्रिल रोजी बीड सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान मागील चार महिन्यांपासून या परप्रांतीय टोळीने बीड जिल्ह्यासह शेजारच्या जालना व औरंगाबाद जिल्ह्यात उभ्या वाहनातून डिझेल चोरी करत धुमाकूळ घालत लाखो लिटर डिझेल चोरी करून वाहन चालकांची मोठी लूट केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
सय्यद मुक्तार सय्यद करीम (44, रा.लक्कडकोट जि.जालना), खेमचंद तुलसीराम जाटो (34, रा.लक्ष्मीनगर, जि.साजापूर, राज्य मध्यप्रदेश), शोकत मजीद मेव (36), अनिलकुमार बाबुलाल (36), हफिज कासम खॉ (28), अशोक नजीर चावरे (30, सर्व रा.दुपाडा, मोहर बडोपिया, जिल्हा साजपूर, राज्य मध्यप्रदेश) व आवेश खान दादेखान (32, रा.मिल्लतनगर, जि.जालना) यांचा आरोपीत समावेश आहे. 8 फेब्रुवारी 2022 रोजी बीड ग्रामीण ठाणे हद्दीतील नामलगाव येथील पेट्रोल पंपाजवळ उभ्या असणार्या 5 ट्रकमधील तब्बल 1 लाख 3 हजार 158 रूपये किंमतीचे 1100 लिटर डिझेल चोरीला गेले होते. हा सारा प्रकार पहाटे 4 ते 5 वाजेच्या सुमारास घडला होता. या प्रकरणी पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक सतीश राजाभाऊ चव्हाण यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
महत्वाचे म्हणजे डिझेल चोरीचा सर्व प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीत कैद झाला होता. एक स्कॉर्पिओ व एका कारमध्ये डिझेल भरलेल्या कॅन्ड आरोपी ठेवतांना दिसत होते. पोलिसांनी या अनुषंगाने संपूर्ण तपास सुरू केला होता. तपासाअंती घटनेच्या दोन तासापूर्वी ही दोन्ही वाहने पाडळसिंगी (ता.गेवराई) येथील टोलनाक्याहून नामलगावकडे आल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी सखोल तपास करत सुरूवातीला मुक्तार सय्यद यास 12 एप्रिल रोजी जालना येथून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने साथीदारांच्या मदतीने डिझेल चोरी केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. त्यानंतर इतर सर्व आरोपी तसेच चोरीचे डिझेल विकत घेणार्या एका आरोपीस 12 एप्रिल रोजी जालना जिल्ह्यातील गजाआड केले. बुधवारी सातही आरोपींना बीड न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पोलिस आता अधिक तपास करत आहेत.प्रभारी पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, ग्रामीण ठाण्याचे पोनि.संतोष साबळे, सहाय्यक निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पवन राजपूत, पो.ना.अंकुश वरपे, पो.ना.दिगांबर शिंदे, पो.ना.गणेश कांदे, पो.ना.दादासाहेब सानप यांनी ही कारवाई केली.
स्वस्तात डिझेल घ्यायचे अन् चढ्या दराने विकायचे!
या प्रकरणातील सय्यद मुक्तार सय्यद करिम हा मुख्य आरोपी असून तो त्याच्या इतर 5 साथीदारांना उभ्या वाहनातून डिझेल चोरी करावयास सांगायचा. नंतर त्यांच्याकडून तो स्वस्तात डिझेल विकत घ्यायचा. नंतर हेच डिझेल तो आरोपी आवेश खान दादेखान यास चढ्या दराने विकायचा त्यामुळे फुकटात अधिकचे पैसे मिळायचे अन् नंतर याच पध्दतीने ते अनेक ठिकाणी डिझेल चोरी करायचे अशी माहिती पोलिस तपासात समोर आली.