बीड – सिरसदेवी ता.गेवराई जि. बीड येथे ज्येष्ठ नागरिक तथा बीड जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटना सहसंघटक नवनाथ गोविंदराव पवार यांच्या संकल्पनेतून व बीड चे माजी आ. सुनील धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोमाता म्हणजेच गाईचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
हा अतिशय आगळावेगळा अनोखा असा कार्यक्रम होता. कारण यापूर्वी आपण महिलांचे डोहाळे जेवण व त्याचे अनेक कार्यक्रम पाहिले आहेत. परंतु सिरसदेवी येथील ज्येष्ठ नागरिक नवनाथ पवार यांना आपल्या परिवारातील सदस्य असलेल्या गाई बद्दल अत्यंत आत्मीयता प्रेम जिव्हाळा व वात्सल्य आहे. ते गाईला प्राणी न समजता आपल्याच कुटुंबातील एक सदस्य समजतात. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या गाईचे आपल्या आई च्या नावावरून मथुरा असे नामकरणही केले आहे.
गाय फक्त प्राणी नसून हिंदू धर्माच्या मान्यते प्रमाणे गायीमध्ये 33 कोटी देव वास्तव्य करतात. गाय दुध देते, गायीचे शेन शेतीसाठी अतिशय उपयुक्त असते. तसेच गाईचे गोमुत्र पवित्र समजले जाते. गायीच्या शेना मुळे शेतीला उत्कृष्ट प्रकारचे सेंद्रिय खत मिळते व जमिनीची सुपीकता वाढते. असे एक ना अनेक गाईचे फायदे आहेत. गाईच्या अंगात सद्गुन असतो. गाय आपल्या साठी एक आदर्श आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून आपला नातू नवजीत गोवर्धन पवार यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांनी मथुरा गाईचे डोहाळे जेवण केले. या कार्यक्रमासाठी बीडचे माजी आमदार सुनील धांडे, महावितरण अभियंत्याचे महासचिव सूर्यकांत पवार यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी उपस्थित सर्व आप्त इष्ट मित्र पाहुणे महिला बालके यांना सुरुचि सस्नेह भोजन देण्यात आले. हा आगळावेगळा कार्यक्रम पाहण्यासाठी सिरसदेवी पंचक्रोशीतील असंख्य लोक उपस्थित होते.
गाईचा झालेला सन्मान, गाई प्रती असणारे प्रेम पाहून उपस्थित महिलांचे डोळे पाणावले. प्रत्येकाने प्राणी मात्रा बद्दल अशीच दया दाखवली तर प्राण्यांची संख्या निश्चितच वाढेल यामुळे शेतीला समाजाला व देशाला फायदा होईल,याबाबत तिळमात्र शंका नाही. पवार व नांदे परिवार यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. अशा या स्तुत्य कार्यक्रमाबद्दल पवार व नांदे कुटुंबाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.