मुंबई – राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी संपावर अखेर तोडगा निघाला आहे.मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात विलीनीकरण वगळता इतर मागण्या मान्य झाल्या आहेत.त्यामुळे एसटी चा संप मिटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या एसटी संपाचा तिढा अखेर सुटला आहे. 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने कर्मचाऱ्यांना दिले आहेत. विलीनकरणाची मागणी मान्य झाली नसली तरी इतर मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.
22 एप्रिलपर्यंत कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्यास तयार राज्य सरकार तयार असल्याची माहिती राज्य सरकारने कोर्टात दिली. कर्मचाऱ्यांना कामावर रुजू केलं जाईल मात्र गुन्हे मागे घेऊ शकत नाही. तसेच पुन्हा असे वर्तवणूक केले जाऊ नये अशी अट घालून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घ्यावे, असेही हाय कोर्टने निर्देश दिले आहेत.
कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटी देण्याचेही आदेश दिले आहेत. कोविडचा भत्ता देण्याचेही स्पष्ट आदेश दिले आहेत. प्रत्येक डेपोला ९५ लाख कोविड भत्ता देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, संध्याकाळपर्यंत लिखित आदेश वाचू, कारण सरकारवर आमचा विश्वास नाहीये. त्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ, अशी माहिती कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे.