बीड – दारूच्या नशेत असलेल्या डीवायएसपी संतोष वाळके यांनी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे यांना कार्यालयात बोलावून मारहाण करण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणी गोरे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली आहे.
बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था वेशीला टांगली आहे हे राष्ट्रवादीसह विरोधी पक्ष घसा ओरडून सांगत असताना गृहमंत्री मात्र त्याकडे फारसे गांभीर्याने पाहत नसल्याच दिसून आले आहे, मात्र जिल्ह्यातील कायदा अबाधित रहावा याची जबाबदारी ज्या पोलीसांवर आहे तेच किती बेजबाबदारपणे वागत आहेत हे मंगळवारी समोर आले आहे. शिवसेना नेते, माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे यांना डीवायएसपी ऑफीसमध्ये बोलावून घेत पोलीस उपाधीक्षक संतोष वाळके यांनी दारुच्या नशेत मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी दिलीप गोरे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली असून कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
दिलीप गोरे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 5 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आपल्याला डिवायएसपी संतोष वाळके यांचा आणि बीड ग्रामीणचे सहाय्यक निरीक्षक योगेश उबाळे यांचा फोन आला. तातडीने डिवायएसपी ऑफीसमध्ये या असा निरोप दिला गेला. मी स्वत: 5.40 वाजता एसपी ऑफीसला पोहोचलो. त्यानंतर मी त्या ठिकाणी असताना पोहेकॉ. कल्याण औटे, सुनील पाटील व विजय गिराम हे त्या ठिकाणी बोलत असताना क्र.(एम.एच.23-1609) या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून राहुल अर्जुन दुबाले हा तिथे आला. त्याच्या बाजूच्या सीटवर डिवायएसपी संतोष वाळके हे बसलेले होते. संतोष वाळके यांच्या चालण्यावरुन ते दारु पिल्याचे स्पष्टपणे जाणवत होते.
वाळके खाली उतरल्यानंतर राहुल दुबाले याने माझ्या अंगावर गाडी घालून माझा खून करण्याचा प्रयत्न केला, मी जीव वाचवून बाजूला झालो. त्यानंतर बीड ग्रामीणचे उबाळे तेथे आले, आणि मी व माझा वाहनचालक राम परजणे याच्यासोबत डिवायएसपींच्या कक्षाकडे गेलो.
त्यावेळी वाळके हे दारु पिलेल्या अवस्थेत कक्षात बसले होते, त्यांनी परजनेंना बाहेर जाण्यास सांगीतले, आणि उबाळे व डोके या दोघांना दार लावून घेण्यास सांगीतले.त्यांच्या टेबलवर असलेली सुंदरी व एक पोलीस काठी हातात घेवून वाळके हे माझ्याकडे धावले. मला एकेरी भाषेत ‘तू दिलीप गोरे आहेस का?’ असे म्हणत तुझा एक आक्षेपार्ह व्हिडिओ माझ्याकडे आहे, असे म्हणत पांढरे कपडे घालून कशाला फिरतोस? असे ओरडत डोके यांना मला मारहाण करण्याचे आदेश दिले. त्यावेळी मी चप्पल बाहेर काढण्याच्या बहाण्याने बाहेर पडलो अन् माझा जीव वाचवला. माझा मोबाइल वाळके यांच्या कार्यालयातच असून दारुच्या नशेत कार्यालयात बोलावून घेत मला मारहाण करण्याचा प्रयत्न करणारे डिवायएसपी वाळके, राहुल दुबाले यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोरे यांनी केली आहे.