अंबाजोगाई – भरधाव वेगातील कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले अन रस्त्याच्या कडेला गप्पा मारत उभ्या आलेल्या तिघांचा नाहक बळी गेल्याची घटना घाटनांदूर शहरात घडली.तब्बल चारशे ते पाचशे फूट लांबपर्यंत या कारने चार जणांना फरपटत नेले.कारचा वेग इतका होता की रस्त्यावरील विजेचा खांब देखील उन्मळून पडला.
वैभव सतीश गीरी ( वय १७ वर्ष ) लहू बबन कोटुळे ( वय ३० वर्ष ) असे जागीच ठार झालेल्या दोघांची नावे असून, रमेश विठ्ठल फुलारी ( वय ४७ ) असे लातूर येथे घेऊन जाताना मृत्यू झालेल्या जखमीचे नाव आहे. तसेच उध्दव निवृत्ती दोडतले हे गंभीर जखमी आहेत.
हे चौघेही सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घाटनांदूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका टपरी समोर उभे होते. यावेळी अंबाजोगाईच्या दिशेने कार क्रमांक एम.एच. २४ व्ही २५१८ ही भरधाव वेगाने आली. चौकात येताच चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती सरळ या चौघांवर येऊन धडकून फरफटत नेले. पुढे विद्युत खांबाला धडकून कार थांबली. अपघात घडताच ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली परंतु वैभव गिरी व लहू काटुळे हे जागीच ठार झाले होते तर रमेश फुलारी आणि उध्दव दोडतले हे गंभीर जखमी होते. या दोघांनाही तातडीने अंबाजोगाई येथे हलविण्यात आले. रमेश फुलारी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले. लातूर येथे जाताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. एका अपघाताने तिघांचा बळी गेला आहे.