अंबाजोगाई – एकीकडे देशभरात हिंदू नववर्ष अर्थात गुढी पाडव्याचा सण आनंदात अन उत्साहात साजरा केला जात असताना दुसरीकडे अंबाजोगाई तालुक्यात मात्र थरारक घटना घडली.शेपवाडी येथील हनुमान मंदिरात पुजाऱ्यावर धारदार शस्त्राने वार करून एका माथेफिरूने पुजाऱ्याचा खून केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
संतोष दासोपंत पाठक हे अंबाजोगाई शहरातील रविवार पेठ भागात राजतात.गेल्या अनेक वर्षांपासून ते शेपवाडी येथील हनुमान मंदिरात नित्यपूजेचे काम करतात.
शनिवारी गुढी पाडवा असल्याने पाठक गुरुजी सकाळीच पूजेसाठी मंदिरात गेले होते.पूजाअर्चा झाल्यानंतर ते येणाऱ्या जाणाऱ्या भाविक भक्तांना प्रसाद देत मंदिरातच होते.दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात माथेफिरू मंदिरात घुसला.त्याने पाठक यांच्यावर चाकूने सपासप वार करून पळून गेला.
या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी जखमी पाठक यांना अंबाजोगाई च्या रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टर यांनी त्यांना मृत घोषित केले.नेमकी ही हत्या का करण्यात आली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.