बीड – बीड शहरातील नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यात अपयशी ठरलेल्या सीओ उत्कर्ष गुट्टे यांच्यासह सहा जणांवर निलंबनाची कारवाई झाली आहे.नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधिमंडळात ही घोषणा केली.त्यांच्या या निर्णयामुळे एकच खळबळ उडाली आहे. आ विनायक मेटे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी वरून ही कारवाई झाली.मंत्री महोदयांना ब्रिफिंग करण्यासाठी यातील एकही अधिकारी उपस्थित नसल्याने ही कारवाई तडकाफडकी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बीड नगर पालिकेचे सीओ उत्कर्ष गुट्टे,नीता अंधारे, राहुल टाळके,ट्रेसर सलीम ,सुधीर जाधव आणि योगेश हांडे या सहा जनावर निलंबनाची कारवाई झाली आहे.
बीड शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत,बोगस नळ कनेक्शन बाबत कारवाई होत नाही,शहरात प्रसाधनगृह व इतर सुविधा मिळत नाहीत,सीओ गुट्टे यांचा मनमानी कारभार वाढला आहे.अशा अनेक तक्रारी असल्याने शिवसंग्राम चे आ विनायक मेटे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
याबाबत माहिती देण्यासाठी सीओ गुट्टे आणि इतर कर्मचारी मुंबईत गेले होते,मात्र रविवारी माहिती दिल्यानंतर सोमवारी हे कोणीच मंत्री महोदयांकडे फिरकले नाहीत.त्यामुळे सोमवारी विधिमंडळ कामकाज सुरू होताच नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सीओ सह इतरांच्या निलंबनाची घोषणा केली.
बीड नगर पालिकेचे सीओ गुट्टे यांच्याबाबत अनेक तक्रारी होत्या,बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील दोन तीन बैठकीत गुट्टे यांच्या कारभरावरून त्यांना झापले होते.आता थेट निलंबनाची कारवाई झाल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.