December 10, 2022

जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे – धनंजय मुंडे !

जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे – धनंजय मुंडे !

बीड – जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमात पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे देखील विकासकामात योगदान असल्याचे सांगत यापुढे देखील विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. राजकीय कलगीतुऱ्याने कार्यक्रम चांगलाच रंगला.

बीड जिल्हा परिषद नूतन प्रशासकीय इमारतीचे कोल्हापूर येथून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ऑनलाईन उपस्थितीद्वारे लोकार्पण केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी महसूल, ग्राम विकास, बंदरे खार जमीन विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शिवकन्या शिरसाट, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विनायक मेटे, आमदार संजय दौंड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पंचायत राजची संकल्पना राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मांडली. यातून सत्तेचे विकेंद्रीकरण केले गेले, असे स्पष्ट करून ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला थेट निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. हा मोठा निधी उपलब्ध असून त्यामधून अधिक चांगले काम होणे अपेक्षित आहे. कोरोना कालावधीत बीड जिल्हा परिषदेने चांगले काम केले आहे. देशाच्या रक्षणासाठी लढणारे माजी सैनिक व सैनिकांच्या विधवा पत्नी यांना मालमत्ता कर माफ करण्याचा देखील निर्णय चांगला आहे, असे ते यावेळी म्हणाले.

पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांच्या सुसज्ज नवीन प्रशासकीय इमारतींना मंजुरी देताना जिल्हाधिकारी कार्यालय व विश्रामगृहासाठी नवीन इमारतीला मान्यता दिली आहे याच बरोबर आज उद्घाटन झालेल्या जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत अजून दोन मजले बांधण्यात येणार असून सुधारित पस्तीस कोटी रुपयांची मान्यता दिली आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बीड जिल्ह्याला मागासलेला जिल्हा ही ओळख पुसून टाकायची असेल तर सर्वपक्षीय नेत्यांनी एका व्यासपीठावर येऊन, सकारात्मक विकासकामे हाती घ्यावीत; जिल्ह्यातील नगर बीड परळी रेल्वे मार्गास केंद्र व राज्य सरकारने प्रमाणात निधी द्यावा व हे काम वेगाने पूर्ण केले जावे, यासाठी जिल्ह्याच्या खासदार यांनीही प्रयत्न करावेत.

पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, बीड जिल्ह्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विम्याचा नवा पॅटर्न निर्माण केला. राज्यातील इतर जिल्ह्यातही तो लागू केला जाणार आहे. काही वर्षांपूर्वी कोणतीही पीक विमा कंपनी जिल्ह्यात येण्यास तयार नसताना नवीन पीक विमा योजना लागू केली गेली व हा पीक विमा पॅटर्न देशाच्या इतिहासात महत्त्वाचा ठरताना सोयाबीनसारख्या पिकाच्या नुकसानीमुळे 25 टक्के पीक विमा अग्रीम शेतकऱ्यांना दिले गेले. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या स्थितीत ही मदत महत्त्वाची ठरली. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता पन्नास हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय देखील राज्य शासनाने घेतला आहे.

यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीड जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या माझा गाव सुंदर गाव या अभियान पुस्तिकेचे अनावरण व संदेश वाचन करण्यात आले. संदेश वाचनामधून पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी 15 एप्रिल 2022 पासून अडीच महिने जिल्ह्यात हे अभियान चालणार असून या कालावधीत चांगले काम करणाऱ्या प्रत्येक तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर देखील गुणवत्तेच्या आधारे सर्वोत्कृष्ट तीन ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात येईल, असे सांगितले.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, या जिल्हा परिषद नूतन प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून सामान्य जनतेसाठीच्या योजनांना ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊ. सामाजिक व पायाभूत विकासासाठी निधी दिला जाईल. शासनाने पिण्याच्या पाण्यासाठी योजना राबविताना प्रत्येक गावाला बंद नळातून पाणी देण्यात येईल, यासाठी वॉटर ग्रीड तयार करण्यात येत आहे. सध्याच्या जिल्हा परिषद सदस्य सभागृह सदस्यांची मुदत संपत असून बीड जिल्हा परिषदेवर दिनांक 21 पासून प्रशासक कार्यरत असतील. त्यांच्या माध्यमातून विकासाची कामे पुढे चालू ठेवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीबरोबरच पंचायत समितीसाठी देखील नवी इमारत पूर्ण झाली आहे. यासह नवीन विश्रामगृह इमारतीसाठी मंजुरी देण्यात आली असून जिल्हा रुग्णालयात महिलांसाठी दोनशे खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे, ही आनंदाची बाब आहे. राज्य शासनाने बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 211 च्या सौंदर्यीकरण पोल शिफ्टिंग या कामांसाठी देखील वीस कोटी रुपये मंजूर केले आहेत, ही बीड शहर विकास साठी मोठी गोष्ट आहे, असे ते म्हणाले.

आमदार विनायक मेटे म्हणाले, ग्रामीण भागाशी संबंध असलेले जिल्हा परिषद हे जणू मिनी मंत्रालयाचा असून महापुरुषांच्या कामाची प्रेरणा घेऊन जनतेचे कामे गतीने करणारा कारभार व्हावा.

जिल्हा परिषदेच्या नवीन इमारत प्रांगणामध्ये छत्रपती संभाजी महाराज भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांसह लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे, स्व. बाळासाहेब ठाकरे , स्वर्गीय सुंदरराव सोळंके , स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर या महापुरुष व लोकनेत्यांचे पुतळे उभारण्यात येणार असून त्यांचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. मुंडे, राज्यमंत्री श्री. अब्दुल सत्तार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आज करण्यात आले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click