मुंबई – पगार लाख दीड लाख महिना अन संपत्ती मात्र शेकडो कोटींची ही कहाणी आहे परिवहन खात्यातील अधिकारी बजरंग खरमाटे यांची.आयकर विभागाने खरमाटे यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेवर छापे घातल्यानंतर मोठं घबाड हाती लागल आहे.या खरमाटे महाशयांचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी निटकचे संबंध असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे परब हे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे.
बजरंग खरमाटे यांचे मूळ वेतन 60 हजार रुपये आहे. सर्व भत्ते मिळून त्यांचा दरमहा पगार एक ते सव्वा लाखाच्या पुढे जात नाही. असे असताना खरमाटे यांनी कोट्यवधींची मालमत्ता घेण्यासाठी पैसा कसा उभा केला, हा एकच प्रश्न आयकर तपासाचा केंद्रबिंदू झाला आहे.
खरमाटे हे बीड जिल्ह्यातील एका राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याचे व्याही असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे क्लासमेंट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
खरमाटे यांनी सांगली, बारामती आणि पुण्यात मोकळे भूखंड घेतले आहेत.तसेच
पुण्याजवळ 7 वर्षांत 100 एकरहून अधिक शेतजमीन खरेदी केली आहे. खरमाटे यांनी बारामतीत एक जमीन विकली आणि या व्यवहारातून त्यांच्याकडे बेहिशेबी दोन कोटी रुपये आल्याचाही खुलासा आयकरच्या हाती लागला.खरमाटे यांचा एक नातेवाईक बांधकाम उद्योगात असून, त्याच्या कंपनीला राज्य सरकारची अनेक कंत्राटे मिळाली. या कंत्राटांच्या रकमा बोगस खरेदी, बोगस सब कॉन्ट्रॅक्ट्स दाखवून 27 कोटींपर्यंत फुगवण्यात आल्याचेही आयकर छाप्यात दिसून आले.बांधकाम व्यवसायातील करचुकवेगिरीबाबतही पुढील तपास सुरू आहे.
या सगळ्या प्रकरणात परिवहन मंत्री अनिल परब यांचे नाव समोर येत असल्याने ते देखील अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.