बीड – हवाला व्यावसायिकांना धमकावून खंडणी गोळा केल्या प्रकरणी जर पुण्याच्या आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्यावर कारवाई होऊ शकते तर बीड मधील पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे. बीड शहर ठाण्याच्या हद्दीत हवाला रॅकेट वर कारवाई झाली मात्र इतके दिवस हे रॅकेट पोलिसांच्याच आशीर्वादाने सुरू होते हे नाकारून चालणार नाही.प्रभारी असणारे पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार हे कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हवाला रॅकेट सुरू असल्याने आणि या व्यावसायिकांना पोलिसच हप्ते घेऊन संरक्षण देत असल्याचे उघड झाले होते. पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी अंगडीया व्यावसायिकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसूल करत असल्याचे स्पष्ट झाले होते. आता त्रिपाठी हे फरार असल्याने पुणे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कारवाईचा फास आवळला आहे.
पुण्यापासून ते बीडपर्यंत नेटवर्क असलेल्या हवाला रॅकेट वर कधीच कारवाई होताना दिसत नाही.बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात ते आठ हवाला केंद्र आहेत,मात्र ठाणे प्रमुख सानप आणि कलेक्शन करणारा परजने व त्याचा सहकारी यांचे या हवाला केंद्र चालकांना अभय आहे.त्यामुळे या लोकांवर कसलीच कारवाई होत नाही.
बीडमध्ये सुरू असलेल्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश पंकज कुमावत यांनी केल्यानंतर शहर पोलिसांचे म्हणजेच सानप यांचे या हवाला रॅकेट चालकांना अर्थपूर्ण अभय असल्याचे समोर आले होते.सानप यांच्यावतीने परजने हा कलेक्शन करतो,एका व्यावसायिकांकडून तीन ते सात हजार रुपये महिना घेतला जातो हे सर्व वरिष्ठांसमोर अनेकदा उघड झाले आहे .मात्र अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही.
अवैध धंदे वाढल्याने अन कायदा व सुव्यवस्था बिघडल्याने विरहिमांडळातून ज्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले त्या आर राजा यांचा चार्ज ज्या लांजेवार यांच्याकडे आहे ते तरी या अशा हवाला रॅकेट वाल्याना पाठीशी घालणाऱ्या सानप,परजने सारख्याना कायद्याचा बडगा दाखवतील का असा सवाल उपस्थित होत आहे.