बीड – वक्फ जमिनीचा आणखी एक घोटाळा बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे.माजलगाव तालुक्यातील जमिनीची परस्पर खरेदी विक्री केल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एका पुरवठा अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचे समोर येत आहे.
माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील मस्जिदची जागा म्हणून नोंद असलेल्या आणि वक्फ बोर्डाची मालकी असलेल्या सर्व्हे नं . 36, 37 मधील 44 एकर 8 गुंठे जमीन खिदमद माश असतांना तत्कालीन उपजिल्हाधिकारी यांनी सदर जमीन बेकायदेशीररित्या खालसा केल्याचं समोर आलं आहे.या प्रकरणी प्रदीप विश्वनाथ आगाव, बिभीषण रंगनाथ बोधवड, रंगनाथ बापुराव बोधवड, अभिमन्यू रंगनाथ बोधवड, अनुसया विश्वनाथ निरडे, शितल गणेश इरमले, स्नेहल अभिमन्यु बोधवड, सय्यद रज्जाक सय्यद जाफर, सय्यद रईस सय्यद जाफर आणि प्रशांत उत्तमराव तोष्णीवाल या 10 जणांविरूद्ध कलम 420 , 406 , 467 , 468 , 471, 447 , 448 , 120 ब , 34, 409 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
नित्रुडच्या या जमीन विक्रीच्या प्रकरणात महसूल विभागातले बडे अधिकारी सुद्धा सहभागी असल्याची माहिती मिळत आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महसूल अधिकारी आणि काही कर्मचारी यांनी ही जमीन खालसा करून स्वत:च्या नावावर करण्यासाठी हेतूपूर्वक प्रयत्न केल्याचे पाहायला मिळत आहे. उपविभागीय अधिकारी अभिमन्यू रंगनाथ बोधवड हे नांदेड जिल्ह्यात पदावर असल्याची माहिती मिळाली असून त्यांच्या पत्नीच्या नावे इनामी जमीन खरेदी केलेली असल्याची माहिती मिळाली आहे.
सदरील जमीन विक्री करण्यासाठी तात्कालीन जिल्हा अधिकारी भूसुधार यांनी तहसीलदार माजलगाव यांच्या 30 जुलै 2010 रोजीच्या अहवालानुसार बेकायदेशीरपणे विक्रीची परवानगी दिली असल्याची तक्रार वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिंद्रुड ठाण्यात दिली आहे. अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून बीड ते तत्कालीन पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी ही जमीन हस्तांतर करून नावावर करण्यासाठी खटाटोप केल्याचे पुढे येत आहे.