बीड- राज्याचे माजी महसूलमंत्री तथा भाजपचे आ सुरेश धस यांच्यासह पत्नी प्राजक्ता धस आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत.यामुळे धस यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
भाजप आ सुरेश धस आणि पत्नी प्राजक्ता धस संचालक असलेल्या जयदत्त ऍग्रो इंडस्ट्रीज आणि मच्छीन्द्रनाथ ओव्हर्सिज या उद्योगासाठी मुंबई बँकेने कर्ज दिले होते.हे कर्ज वाटप करताना नियम धाब्यावर बसवून बोगस कागदपत्रांच्या आधारावर वाटप करण्यात आले.
मुंबई बँकेचे तत्कालीन चेअरमन तथा विद्यमान विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी तब्बल 27 कोटी रुपयांचे कर्ज बेकायदेशीर पणे दिले.बँकेने कर्ज वाटप करताना कार्यक्षेत्राबाहेरील संस्थांना कर्ज वाटप केले.
या सगळ्या प्रकरणात जी कागदपत्रे दाखल केली गेली ती बोगस असून मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता असल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे या प्रकरणी धस,त्यांच्या पत्नी आणि दरेकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत.
या प्रकरणानंतर आ धस हे अडचणीत आले असून त्यांच्या समर्थकांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.