बीड – बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चकरी,मटका,जुगार,हवाला,गुटखा सुरू असल्याचे न्यूज अँड व्युज ने 5 फेब्रुवारी ला प्रकाशित केल होत,तेव्हा बीड शहर चे पोलीस निरीक्षक सानप यांना चांगलाच राग आला होता,मात्र आम्ही जे छापलं ते सत्य होत हे आता कुमावत यांच्या कारवाईने समोर आलं आहे.याचाच अर्थ बीड शहर पोलीस हे कलेक्शन च्या नादात अवैध धंदे करणाऱ्यांना पाठीशी घालत होते हे उघड झाले आहे.

बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे राजरोस सुरू असल्याची बातमी न्यूज अँड व्युज ने केली होती.त्यानंतर पीआय रवी सानप यांनी काही पत्रकार अन पोलिसांजवळ शहर ठाण्याच्या हद्दीत अस काही सुरू नसल्याचं बोलत आम्हाला खोटं ठरवण्याचा उद्योग केला होता.
परजने नामक व्यक्ती त्यांच्यासाठी मटका,गुटखा,पत्याचे क्लब,चकरी मालक अन हवाला रॅकेट चे कलेक्शन करत असल्याचे आम्ही लिहिले होते.त्यानंतर एक दोन दिवस शहर पोलिसांनी काही चकरी चालकांवर कारवाई केली अन नंतर पुन्हा पहिले पाढे पढ पंचावन्न अशी गत झाली.
दरम्यान सोमवारी रात्री अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने बीड शहरात सुरू असलेल्या हवाला रॅकेट चा पर्दाफाश केला.पन्नास लाखापेक्षा जास्त रोकड अन तीन जणांना ताब्यात घेतले.ही कारवाई शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या परिसरात झाली.याचाच अर्थ शहर पोलीस हे या गोष्टीकडे कानाडोळा करत होते.
विशेष बाब म्हणजे यातील काही हवाला रॅकेट चालकांकडे दहा बारा महिन्यांचे हप्ते बाकी होते,कोरोनाच्या काळात या लोकांनी न दिलेले हप्ते मागण्यांसाठी त्यांच्याकडे पोलिसांनी तगादा लावला होता.बीड शहरात आठ ते दहा हवाला रॅकेट चालवणारे लोक आहेत,प्रत्येकाकडून प्रति महिना किमान तीन ते पाच हजार रुपये गोळा केले जातात अशी चर्चा आहे.वर्ष दीड वर्षाचे हप्ते दिल्याचा दावा हे लोक करत होते तर पोलीस मात्र हप्ते पोहचले नसल्याचं सांगत त्यांना दम भरत होते.
कुमावत यांच्या कारवाईने बीड शहर पोलिसांचे पितळ उघडे पडले असून आता वरिष्ठांनी या गोष्टीची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.अन्यथा हप्तेखोरीचा हा सिलसिला असाच सुरू राहील.