बीड- जमिनीच्या वादातून रजिस्ट्री कार्यालयात झालेल्या गोळीबार प्रकरणी रात्री उशिरा बीडचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, नगरसेवक डॉ योगेश क्षीरसागर यांच्यासह सतीश पवार आणि इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे.गोळीबारात जखमी झालेल्या सतीश क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.काका पुतण्यातील संघर्ष यामुळे आता शिगेला पोहचला आहे.
बिडकरांची शुक्रवारची सकाळ एका थरारक घटनेने झाली.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या रजिस्ट्री कार्यालयात गोळीबार झाला अन एकच खळबळ उडाली. या ठिकाणी सतीश पवार हे जमिनीची खरेदी करण्यासाठी आले होते.त्यावेळी तेथे आ संदिप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर हे आपल्या समर्थकासह हजर होते.
यावेळी पवार आणि क्षीरसागर गटात बाचाबाची झाली अन सतीश पवार यांनी त्यांच्याकडील पिस्तुल मधून गोळीबार केला.यात सतीश क्षीरसागर आणि फारोकी हे दोघे गंभीर जखमी झाले.या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी एसपी आर रामस्वामी यांच्यासह पोलीस पथकाने भेट देऊन पाहणी केली होती.
दरम्यान या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.जखमी सतीश क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून डॉ भारतभूषण क्षीरसागर, डॉ योगेश क्षीरसागर, सतीश पवार,प्रमोद पवार,विनोद पवार,रवी पवार,आदित्य पवार अन्य एक या आठ जणांवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
डॉ भारतभूषण क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर यांनी सतीश क्षीरसागर हे आठ दिवसापूर्वी बंगल्यावर असताना त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर ते शुक्रवारी सकाळी पंचायत समिती समोरून येत असताना सतीश पवार व इतरांनी तलवार ,लाठ्या काठ्यांनी मारहाण करत चार गोळ्या झाडल्या आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला,यावेळी हेमंत क्षीरसागर यांनी आल्ल्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असे फिर्यादीत म्हटले आहे.
गेल्या तीन चार वर्षांपासून बीडमध्ये सुरू असलेला संदिप क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर या काका पुतण्यातील संघर्ष प्रत्येक निवडणुकीत बीड करांनी अनुभवला आहे.आता गोळीबाराच्या घटनेने हा संघर्ष अधिकच शिगेला पोहचला आहे.