बीड – जमिनीच्या वादातून बीडचे आ संदिप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर आणि बंधू नगर पालिकेचे उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांना गोळ्या घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. बीडच्या रजिस्ट्री कार्यालयात सतीश पवार यांनी गोळीबार केला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.यात क्षीरसागर यांचे दोन कार्यकर्ते जखमी झाले .सुदैवाने दोन्ही क्षीरसागर बापलेक या हल्ल्यातून बचावले आहेत.जखमींना औरंगाबाद ला हलवण्यात आले आहे.
बीड शहरातील आकाशवाणी परिसरात क्षीरसागर बंधूंची जमीन आहे.या जमिनीवरून आ संदिप क्षीरसागर कुटुंबीय आणि काका भारतभूषण क्षीरसागर कुटुंबियामध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत.
या वादाचे पर्यावसान शुक्रवारी गोळीबारात झाले.आ क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर आणि बंधू न प उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर हे आपल्या काही लोकांसह रजिस्ट्री कार्यालयात असताना सतीश पवार आपल्या काही कार्यकर्त्यांना घेऊन तेथे आले.या ठिकाणी दोन गटात बाचाबाची झाली.
त्यानंतर पवार यांनी हेमंत आणि रवींद्र क्षीरसागर यांच्या दिशेने गोळीबार केला.हे दोघे या हल्ल्यातून बचावले मात्र सतीश क्षीरसागर आणि अन्य एकजण गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.जिल्हा रुग्णालयात देखील मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता.
या प्रकरणी अद्याप तरी गुन्हे दाखल झालेले नाहीत.आजपर्यंत मुद्यावर असलेली काका पुतण्याची ही लढाई आता गुद्यावर अन गोळीबारावर आल्याने शहर वासियात खळबळ उडाली आहे.