बीड – जिल्हा रुग्णालयात झालेल्या कथित रेमडिसिव्हीर इंजेक्शन घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी आलेल्या वरिष्ठांसमोर तत्कालीन सीएस सूर्यकांत गित्ते,एसीएस डॉ राठोड,पुरवठादार गणेश बांगर,चव्हाण,रियाज हे गैरहजर राहिले.केवळ अजिनाथ मुंडे याची साक्ष नोंदवून समिती प्रमुख निघून गेले.पोलीस आणि आरोग्य विभागाच्या चौकशीला सामोरे न जाणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे संशय बळावला आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात गेल्या वर्षी मार्च ते जून दरम्यान मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले होते.त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर रेमडिसिव्हीर इंजेक्शन चा वापर केला गेला.सरकारी सह खाजगी रुग्णालयात देखील रेमडिसिव्हीर वाटप केले गेले.
मात्र वाटलेले इंजेक्शन हे काळ्याबाजारात विकले गेल्याची तक्रार झाली अन तत्कालीन सीएस सूर्यकांत गित्ते,एसीएस डॉ सुखदेव राठोड,गणेश बांगर,अजिनाथ मुंडे,रियाज,राजरतन जायभाये,नितीन चव्हाण यांनी हा सगळा घोटाळा केल्याचे समोर आले.या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर तब्बल चार महिन्यांनी पोलिसांनी यात चौकशी सुरू केली.
गित्ते सह इतरांना चौकशीला हजर राहण्याबाबत अनेकवेळा नोटिसद्वारे बजावण्यात आले.मात्र कोणीच सहकार्य केले नाही.या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते दीपक थोरात आणि गणेश ढवळे यांनी तक्रार केल्यानंतर आरोग्य उपसंचालक कार्यालयाने दखल घेतली.
गुरुवारी सहायक संचालक डॉ दुधाळ हे चौकशीसाठी जिल्हा रुग्णालयात आले होते.मात्र मुंडे वगळता गित्ते,राठोड,गणेश बांगर,चव्हाण,रियाज हे कोणीच हजर राहिले नाहीत.जे अधिकारी पोलीस आणि आरोग्य विभागाच्या चौकशीला सामोरे जात नाहीत त्यांनी नक्कीच काहीतरी गोंधळ केला असल्याचा संशय त्यामुळे बळावला आहे.
चौकशी ला गैरहजर राहणाऱ्या या अधिकाऱ्यांवर आता आरोग्य उपसंचालक कार्यालय काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मात्र गणेश बांगर, मुंडे,जायभाये यांच्या नादि लागून गित्ते आणि राठोड यांनी आपला पाय आणखी खोलात घातला आहे हे निश्चित.