बीड – सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या पालवन येथील सहयाद्री देवराई च्या डोंगराला रविवारी पहाटे आग लागली.यामध्ये हजारो झाडे जळल्याची प्राथमिक माहिती आहे.नेमकी आग कशामुळे लागली याबाबत मात्र माहिती मिळू शकलेली नाही .
बीड शहरानजीक असलेल्या पालवन परिसरातील तब्बल शंभर एकर डोंगरावर सिनेअभिनेते सयाजी शिंदे आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने गेल्या चार वर्षांपूर्वी सह्याद्री देवराई ची उभारणी करण्यात आली.

दोन वर्षांपूर्वी याठिकाणी वृक्ष संमेलन देखील भरवण्यात आले होते.वृक्ष संमेलनाचा हा प्रयोग पहिलाच असल्याने अबाल वृद्धांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला होता.देवराई हे बीड जिल्हा वासियांसाठी एक पर्यटन स्थळ म्हणून अल्पावधीत नावारूपाला आले .

दरम्यान रविवारी पहाटे या भागातील तब्बल पाच ते सहा एकर डोंगराला आग लागल्याची घटना समोर आली आहे.यामध्ये जवळपास पाच ते सहा हजार झाडे जळल्याची प्राथमिक माहिती आहे.आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
