माजलगाव – ज्या जिल्ह्यात सर्वाधिक स्त्री भ्रूण हत्या होतात असा आरोप केला जायचा त्याच बीड जिल्ह्यात मुलीच्या जन्माचे स्वागत अख्या गावाने केल्याची आदर्श घटना घडली आहे .माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथील रासवे दांपत्याला मुलगी झाल्याने अख्ख्या गावाने हलगीच्या तालावर डान्स करत आनंदोत्सव साजरा केला.गावकऱ्यांना तब्बल दीड क्विंटल जिलबी वाटून त्यांचे तोंड गोड करण्यात आले.
माजलगावमधील मोठेवाडी येथील सारिका अशोक रासवे यांना मुलगी झाल्यानंतर या दाम्पत्याने हा आनंद गावकऱ्यांसोबत साजरा केला. गावकऱ्यांनीदेखील रात्रीतून एकत्रित येत रासवे दाम्पत्याच्या आनंदात सहभागी होण्याचा निर्णय घेतला अन् अवघ्या गावाला एखाद्या महोत्सवाचं रुप आलं होतं.
बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपूर्वी स्त्री भ्रूण हत्या हा विषय ऐरणीवर आला होता.एक हजार मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचा दर साडेसातशे ते आठशे पर्यंत खाली आला होता.जिल्ह्यातील अनेक गावांत डॉक्टर मंडळींकडून भ्रूण हत्या अथवा लिंगनिदान सारखे गैरकायदेशीर प्रकार होत असल्याचे उघड झाले होते. डॉ सुदाम मुंडे सारख्या लोकांना जेलची हवा खावी लागली होती.
त्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.आज पाच सहा वर्षानंतर जिल्ह्यातील मुलींच्या जन्माचा दर वाढला असून मुलीच्या जन्माचे स्वागत होताना दिसत आहे. माजलगाव मधील मोठेवाडी येथील घटनेने सर्व मातापित्यांच्या समोर आदर्श निर्माण केला आहे.