बीड – वाळू साठी केलेल्या खड्यातील पाण्यात बुडून चार बालकांचा बळी गेल्यानंतर तब्बल चार दिवसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा चार वाळू माफियांवर दाखल झाला आहे.यावरून प्रशासन किती गेंड्याच्या कातडीचे आहे हे समोर आले आहे.
गेवराई तालुक्यातील गोदावरी पात्र असो की सिंदफना नदीचे पात्र ,वाळू माफियांनी सर्रास वाळू उपसा करून नदीची चाळणी केली आहे.वाळू उपसा करण्यासाठी जेसीबी,पोकलेन च्या माध्यमातून मोठं मोठे खड्डे केले जातात .या खड्यातील पाण्यात बुडून अनेकांचे प्राण गेले आहेत.
शहजाणपूर चकला येथे चार दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्दैवी घटनेत चौघां बालकांचा जीव गेला होता.त्यानंतर या ठिकाणी ग्रामस्थांनी आंदोलन केले होते.अखेर महसूल अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
दरम्यान चार दिवसानंतर या प्रकरणात मयत मुलांच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पांडूरंग चोरमले, विलास निर्मळ, संदीप निर्मळ व आर्जुन कोळेकर (सर्व रा. तांदळवाडी) या चौघांविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि संदीप काळे करीत आहेत.
केवळ गुन्हा दाखल करून वाळू उपसा थांबणार आहे असे होणे शक्य नाही.त्यामुळे गेवराई,बीड,माजलगाव, परळी या भागातून होणारी वाळू वाहतूक बंद करणे आणि ज्या वाहनात वाळू आढळून येईल ते वाहन जप्त करून मालकावर गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे.तालुक्यातील बहुतांश ठिकाणी पोलिसांनी चेकपोस्ट केले आहेत.तसे चेकपोस्ट जर वाळू पट्यात निर्माण केले तर काहीप्रमाणात का होईना वाळू माफियांवर लगाम लागू शकेल.मात्र लाखो रुपये हप्ता घेऊन बसलेले महसूल आणि पोलीस प्रशासन हे करणार का हा खरा प्रश्न आहे.