बीड – आपल्याकडे स्त्रियांच्या शोषणाचा प्रदीर्घ इतिहास आहेे. रामायण महाभारताच्या काळापासून स्त्रियांच्या शोषणाचे संदर्भ सापडतात.सीतेपासून स्त्रियांच्या शोषणाची परंपरा स्पष्टपणे दिसू लागते.डॉ.दीपा क्षीरसागर यांनी लिहीलेले झुंज तिची पाचटाशी हे पुस्तक सध्याच्या काळातील स्त्री शोषणाचे वास्तव समोर आणते.झुंज तिची पाचटाशी हे एका अर्थाने ऊसतोड कामगार स्त्रियांची त्यांच्या जीवनाशी सदोदीत सुरू असलेली झुंजच आहे असे प्रतिपादन उदगीर येथे होऊ घातलेल्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजीत अध्यक्ष भारत सासणे यांनी केले.
डॉ.दीपा क्षीरसागर लिखीत झुंज तिची पाचटाशी या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होतेयावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (अण्णा), नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर,सुप्रसिध्द कवी इंद्रजित भालेराव,प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना सासणे म्हणाले, मराठी वाड.मयामध्ये स्त्रीविषयक लेखनाला साधारणतः सव्वाशे वर्षांची परंपरा आहे.मात्र दीपा क्षीरसागर यांनी ज्याप्रकारचे ऊसतोड महिला मजुरांचे अनुभवविश्व ह्या लेखनातून समोर आणले आहे.ते प्रथमतः घडते आहे.हे लेखन निश्चितच अजोड आहे.बीड जिल्हयाला दुर्देवाने ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते.डॉ.क्षीरसागर यांनी या महिलांचे दुःख आणि अनुभव जाणून घेऊन त्याला मुखरित करण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.अस्सल दाहक जीवनानुभव घेऊन ह्या कथांचा आशय सिध्द झालेला आहे. ह्या लेखनाला रखरखत्या वास्तवाचे अधिष्ठान आहे.त्यामुळे हे लेखन अनुभवाच्या पातळीवर प्रचंड वेगळे आणि महत्वपूर्ण ठरते.यामुळे याचा इंग्रजी,हिंदी आणि अन्य भाषांमध्ये अनुवाद होणे आवश्यक आहे.
यावेळी बोलताना इंद्रजीत भालेराव म्हणाले, डॉ.दीपा क्षीरसागर यांनी केलेले हे वाड.मयीन कार्य अलौकिक आहे.हे जसे सामाजिक आहे तसेच ते सांस्कृतीकही आहे.समाजातील सर्वस्तरातील ग्रामीण स्त्री या कथनातून समोर आलेली दिसते.मराठी साहित्यामध्ये स्त्रियांच्या शोकांतिकेची अनादी परंपरा आहे.हे दुर्देव आहे.या शोकांतिकेच्या समकालीन संदर्भांचा शोध घेत डॉ.क्षीरसागर यांनी हे लेखन केलेले दिसते असे म्हटले .
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड जिल्हयाच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वाटचालीचा आढावा घेऊन डॉ.दीपा क्षीरसागर यांच्या वाड.मयीन कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला.
डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी बीड शहराच्या सांस्कृतिक,शैक्षणिक आणि साहित्यविषयक घडामोंडीवर प्रकाशझोत टाकून पुढील वर्षीचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बीडमध्ये व्हावे अशी इच्छा बोलून दाखविली.
डॉ.दीपा क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त करताना स्वतःची लेखनविषयक भूमिका स्पष्ट करून मी प्रस्तुत लेखनाकडे कशी आकृष्ट झाले याविषयी मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.उज्वला वनवे, अतिथींचा परिचय प्रा.बालासाहेब कटारे, सन्मानपत्राचे वाचन कुलदीप धुमाळे आणि आभार प्रदर्शन डॉ.रामनाथ वाढे यांनी केले. या कार्यक्रमाला बीड शहरातील आणि परिसरातील पुस्तकप्रेमी वाचक,विद्यार्थी आणि नागरीक मोठया संख्येने उपस्थिती होते.