बीड – वाळूसाठी केलेल्या खड्यातील पाण्यात बुडून चार बालकांचा जीव गेला.या घटनेला तब्बल 48 तास उलटून गेले तरीदेखील अद्याप सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला नाही.महसूल प्रशासनाने तक्रार दिलेली नसल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगत पोलिसांनी हात झटकले आहेत.महसूल अन पोलिसांच्या वादात वाळू माफिया मात्र मोकाट आहेत .दरम्यान जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली असून दोन दिवसात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत .
गेवराई तालुक्यातील शहजाणपूर चकला येथे दोन दिवसांपूर्वी चार बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.सिंदफना नदीपात्रात शहजनापूर चकला आणि तांदलवाडी या भागातून गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वाळू उपसा सुरू आहे.वाळू माफियांनी जेसीबी आणि पोकलेन ने नदीपात्रात पन्नास पन्नास फुटापेक्षा जास्त मोठे खड्डे केले आहेत .
त्यामुळे नदीपात्राची चाळणी झाली आहे.वाळू उपस्यामुळे गोदावरी पट्यात अनेकांचे जीव गेले आहेत.शहजनापूर येथील घटनेनंतर ग्रामस्थांनी एकच संताप व्यक्त केला. अखेर प्रशासन जागेवर जाऊन आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आले होते.मात्र दोन दिवस उलटून गेले तरीदेखील अद्याप सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला नाही .
याबाबत पोलीस प्रशासनाने महसूल ने आमच्याकडे तक्रार दिलेली नाही,वाळू उपसा कोण करत,कधीपासून सुरू आहे,याबाबत आम्हाला माहिती नाही त्यामुळे तक्रार आल्याशिवाय गुन्हा दाखल होऊ शकत नाही अस म्हटलं आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी या घटनेनंतर बैठक घेतली.यामध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी गेवराई,उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई,तहसीलदार गेवराई आणि पोलीस निरीक्षक गेवराई यांच्या सदस्यतेखाली समिती नियुक्त केली आहे.
या समितीने घटनेची पार्श्वभूमी, करावयाच्या उपाययोजना, भविष्यातील कारवाई याबाबत 10 फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत .
एकीकडे जिल्हाधिकारी यांनी समिती नियुक्त केली असताना दुसरीकडे गुन्हाच दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने समितीने या गोष्टीची देखील दखल घ्यावी अशी मागणी होत आहे .