गेवराई – गेवराई तालुक्यातील गोदकाठवर वाळू माफियांनी जो हैदोस घातला आहे त्याबद्दल न्यूज अँड व्युज ने वृत्त दिल्यानंतर तहसीलदार सचिन खाडे स्वतः रस्त्यावर उतरले आणि त्यांनी तपेनिमगाव या भागात अवैध वाळू उपसा करणाऱ्या केण्या जप्त केल्या.तहसील प्रशासनाने गेल्या आठ दिवसांपूर्वी देखील वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई केल्याची माहिती खाडे यांनी दिली.
गेवराई तालुक्यातील वाळू उपसा आणि पैशाच्या जोरावर महसूल आणि पोलीस प्रशासनाला विकत घेणारे वाळू माफिया याबाबत न्यूज अँड व्युज ने दोन दिवस बातम्या दिल्या.याबाबत तहसीलदार सचिन खाडे यांनी दखल घेत तालुक्यातील तपेनिमगाव येथे स्वतः जाऊन वाळू उपसा करणाऱ्या केण्या जप्त केल्या.
गेवराईच्या गोदापात्रात वाळू माफियांनी हैदोस घातला आहे.महिन्याला रेट ठरवून तहसील आणि पोलिसांना हप्ते दिले जातात.त्यामुळे किरकोळ कारवाई होऊन वाळू उपसा सुरू असतो.या वाळू उपशामुळे अनेकांचे जीव गेले आहेत.रविवारी रात्री शहजाणपूर चकला येथे चार बालकांचा जीव गेल्यानंतर सोमवारी न्यूज अँड व्युज ने तहसीलदार, पोलीस यांच्याबाबत बातमी केली.
त्यानंतर तहसीलदार खाडे यांनी आपली यंत्रणा कामाला लावली.तपे निमगाव येथे वाळू उपसा करणाऱ्या काही केण्या जप्त करण्यात आल्या.मात्र ही कारवाई एक दिवस न करता सातत्य राहिले तरच वाळू उपसा करणाऱ्यांना थोडाफार पायबंद बसेल.