गेवराई – केवळ अन केवळ पैशाच्या मागे लागलेल्या महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गेवराई तालुक्यात वाळूमुळे लोकांचे जीव जात आहेत.तालुक्यातील शहजाणपूर चकला येथे वाळूसाठी माफियांनी केलेल्या खड्यात साठलेल्या पाण्यात बुडून चार मुलांचा जीव गेला आहे.वाळू माफियाकडून हप्ते घेऊन लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यावर आता तरी कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
गेवराई तालुक्यातील मादलमोही जिल्हा परिषद गटातील शहजाणपूर चकला येथील बबलू गुणाजी वक्ते,गणेश बाबुराव इनकर, आकाश राम सोनवणे आणि अमोल संजय कोळेकर या नऊ ते बारा वर्षे वयाच्या चार बालकांचा खड्यात असलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
सिंदफणा नदीत गेल्या अनेक वर्षांपासून सर्रास वाळू उपसा सुरू आहे.तहसीलदार सचिन खाडे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांना याबाबत ग्रामस्थांनी अनेकवेळा निवेदन देऊन अवैध वाळू उपसा बंद करण्याची मागणी केली होती. मात्र तांदलवादी आणि शहजाणपूर या दोन्ही बाजूने सिंदफणा नदीत जेसीबी पोकलेन ने दहा दहा वीस वीस फुटाचे खड्डे केले आहेत.
मोठ्या प्रमाणात या ठिकानाहून वाळू उपसा सुरू आहे. नदीपात्रात केलेल्या खड्यात पाणी साचलेले आहे.या पाण्यात बुडून या चार बालकांना आपला जीव गमवावा लागला.ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले असून जोपर्यंत वाळू उपसा करणाऱ्या लोकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली आहे.त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेवराई तालुक्यातील बहुतांश भागात सर्रास वाळू उपसा सुरू आहे अन तो ही महसूल अन पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने.तहसीलदार खाडे अन त्यांचे तलाठी,मंडळ अधिकारी हे हप्ते घेण्यात व्यस्त असल्याने कोणत्याच वाळू माफियावर कारवाई होत नाही.दोनच दिवसांपूर्वी राक्षसभुवन येथे केणीचा दांडा लागून एका मजुराचा मृत्यू झाला होता.आज ही घटना घडली आहे.या वाळू माफियांच्या पाठीशी पोलीस अन महसूल प्रशासन ठामपणे उभे असल्याने रोज किमान चारशे ते पाचशे गाड्या वाळू उपसली जाते.यामध्ये नदीचे तर नुकसान होतच आहे पण लोकांचे जीव देखील जात आहेत.पण या वाळू माफियाकडून मिळणाऱ्या लाखो रुपयांच्या हप्त्यापुढे कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.
शहजाणपूर येथे घडलेल्या घटनेनंतर तरी जिल्हाधिकारी आणि एसपी जागे होऊन या भागात सुरू असलेला वाळू माफियांचा नंगानाच थांबवतील का असा सवाल उपस्थित केला जात आहे.