बीड – गेवराई तालुक्यातील गोदावरी पट्यात बेसुमार वाळू उपसा सुरू आहे.या वाळूने गेल्या महिना दोन महिन्यात अनेकांचे जीव घेतलेत.मात्र त्याच्याशी तहसीलदार सचिन खाडे यांना काहीच देणंघेणं नाही.शुक्रवारी दुपारी राक्षसभुवन च्या नदीत वाळू उपसा करणाऱ्या केणीचा दांडा लागल्याने अपघात होऊन एकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. महसूल प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका घेण्यात अन नोटा मोजण्यात व्यस्त आहे.
राक्षसभुवन येथे वाळूचा उपसा करताना राजेंद्र शिंदे या मजुराचा मृत्यू झाला आहे.वाळू उपसा करण्यासाठी ज्या केणीचा वापर केला जातो,त्याचा दांडा लागल्याने पैठण तालुक्यातील खर्डा येथील रहिवासी असलेल्या शिंदे यांचा मृत्यू झाला.
हा सगळा प्रकार समजल्यानंतर दीड दोन तास उलटले तरीदेखील महसूल विभागाने साधी दखल घेतली नाही.यापूर्वी देखील राक्षसभुवन असो की गोदावरीच्या पट्यातील इतर गावे या ठिकाणी अनेक बळी या अवैध वाळू उपस्यामुळे गेले आहेत.मात्र तहसीलदार सचिन खाडे, उपविभागीय अधिकारी, पोलीस,तलाठी,मंडळ अधिकारी हे सगळेच पैसे मोजण्यात व्यस्त असल्याने लोकांच्या जाणाऱ्या जिवाकडे कोणाचेच लक्ष जात नसल्याचे चित्र आहे.
गेवराई तालुक्यातील अनेक गावांत मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू आहे,मात्र त्याच्याशी तहसीलदार किंवा पोलीस प्रशासनाला काही देणंघेणं नाहीये.महिन्याला आपला हप्ता हातात आला म्हणजे लोक मेले तरी चालेल अशी भूमिका खाडे यांच्यासह सगळ्यांनीच घेतली आहे.
यातूनच शुक्रवारी ज्या शिंदे यांचा मृत्यू झाला असल्याची चर्चा या भागात सुरू आहे.शिंदे यांच्या मृत्यूनंतर या भागातील लोकांनी संताप व्यक्त केला आहे.