धारूर – तालुक्यातील अंजनडोह जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रमेश नखाते यांना जी प सीईओ अजित पवार यांनी निलंबित केले आहे.शिक्षकांच्या वेतनात अपहार करणे,एलआयसी च्या पैशात अफरातफर करणे असे आरोप नखाते यांच्यावर होते.
रमेश नखाते असे निलंबित करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. ते धारूर तालुक्यातील अंजनडोह जि.प.कें . प्रा . शाळेअंतर्गत केंद्रीय मुख्याध्यापक असून, त्यांच्यावर मागच्या काही दिवसांपुर्वी शिक्षकांच्या वेतनातील आयकर ८ लाख ४६ हजार ३४६ तसेच एलआयसीच्या ८९ हजार ६७० रक्कमेचा अपहार केल्याचा आरोप आहे. याबाबतीत शिक्षणाधिकारी अजय बहिर यांच्याकडे केंद्रातील ५५ शिक्षकांनी तक्रार दाखल केली . या तक्रारीची दखल घेवून सीईओ अजित पवार यांनी सदरील मुख्याध्यापकास सोमवारी सेवेतून तडकाफडकी निलंबित केले .
बीड जिल्ह्यात यापूर्वी जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार यांनी पत्ते खेळणाऱ्या पाच जुगारी शिक्षकांना निलंबित केले होते.त्यानंतर आता नखाते यांना अपहार केल्याच्या कारणावरून त्यांनी ही कारवाई केली आहे.या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे .