बीड – बीडच्या जिल्हा रुग्णालयात चार सहा महिने शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत असलेले आणि वादग्रस्त ठरलेले डॉ सूर्यकांत गित्ते यांची फिजिशियन म्हणून बीडच्या जिल्हा रुग्णालयात बदली झाली आहे.एका सीएस पदावर राहिलेल्या अधिकाऱ्याला प्रभारी सीएस च्या हाताखाली काम करावे लागण्याची बीडच्या इतिहासातील कदाचित ही पहिलीच घटना असेल.त्यामुळे गित्ते यांची फौजदार पदावरून जमादार पदी नियुक्ती झाल्याची चर्चा होत आहे.आतातरी डॉ गित्ते रुजू होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बीडचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांची नाशिक येथे बदली झाल्यानंतर डॉ सूर्यकांत गित्ते यांनी स्वतःची वर्णी बीडच्या सीएस पदी लावून घेतली होती.मात्र त्यांच्या ढिसाळ कारभाराची जिल्हाभरात चर्चा झाली.
अवघ्या चार सहा महिन्यात कोरोना आटोक्यात आणण्यात ते सपशेल अपयशी ठरले.रेमडीसविर इंजेक्शन चा घोटाळा असो की कोट्यवधी रुपयांची खरेदी यामध्ये डॉ गित्ते यांची बदनामी झाली.तत्कालीन एसीएस डॉ सुखदेव राठोड,गणेश बांगर,अजिनाथ मुंडे,राजरतन जायभाये, ठाकर,चव्हाण यांच्या मदतीने गित्ते यांनी कोट्यवधी रुपये छापल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती.
अखेर त्यांची बदली लोखंडी सावरगाव येथे करण्यात आली,त्यांच्या जागी माजलगाव चे डॉ सुरेश साबळे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती झाली. डॉ गित्ते हे बदलीच्या ठिकाणी रुजू झालेच नाहीत.दरम्यान आरोग्य विभागाने नुकतीच जिल्हा शल्य चिकित्सक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले.
त्यामध्ये सीएस राहिलेल्या डॉ सूर्यकांत गित्ते यांची नियुक्ती पुन्हा बीड जिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे.मात्र आता ते फिजिशियन म्हणून डॉ सुरेश साबळे यांच्या नेतृत्वाखाली काम करतील.
अशा पध्दतीने सीएस राहिलेल्या अधिकाऱ्यावर त्याच ठिकाणी फिजिशियन म्हणून नोकरी करण्याची वेळ पाहिल्यादाच आली आहे.आता यावेळी तरी ते रुजू होणार का हा खरा प्रश्न आहे.