बीड – केजमध्ये तुम्हाला चिन्हावर उमेदवार मिळाले नाहीत,शिरूर,आष्टी,पाटोदा मध्ये स्थानिक नेतृत्वाचा अजब प्रभाव आहे,मग तुम्ही नेमकं यश मिळवलं कशाच असा सवाल करीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे.
नगरपंचायत निवडणुकीमध्ये केज सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी जिथे आमदार व खासदार भाजपचे आहेत तिथे भारतीय जनता पक्षाला व स्थानिक नेतृत्वाला कमळाच्या चिन्हाखाली एकही उमेदवार देता आला नाही, वरून आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार या ठिकाणी पूर्वीपासून असलेली सत्ता राखता आली; त्यासाठीही अनेक यत्न प्रयत्न करावे लागले, मग भारतीय जनता पक्षाने बीड जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकांमध्ये नेमके काय मिळवले? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
राज्यातील नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक नंबरचे स्थान मिळवले असून, महा विकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. असा उल्लेख देखील धनंजय मुंडे यांनी केला आहे.
केज नगर पंचायत निवडणुकीत भाजपला एकही उमेदवार देता आला नाही, तिथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 5 उमेदवार निवडून आले आहेत. भाजपला तिथे उमेदवार देता न येणे ही लाजिरवाणी बाब असल्याची सर्वत्र चर्चा आहे.
आष्टी-पाटोदा-शिरूर या तीनही ठिकाणी स्थानिक नेतृत्वाचे अजब प्रकारचे वर्चस्व आहे, त्यातून त्यांनी सत्ता राखली असली तरी पूर्वी एकही जागा नसायची तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत, लोक आता दहशतीच्या विरोधात मतदान करू लागले आहेत, असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
आयजीच्या जीवावर बायजी उदार अशा राखलेल्या सत्तेच्या जीवावर भाजप नेतृत्वाने हुरळून न जाता पुढील आव्हाने व भूतकाळातील आठवणी यांची सांगड घालावी असा अप्रत्यक्ष टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.