परळी – तालुक्यातील गोवर्धन हिवरा वासीयांची झोप उडवणारी घटना उघडकीस आली आहे.मारुती उगले या सत्तर वर्षीय शेतकऱ्याचा शीर नसलेला मृतदेह आढळून आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे,हा प्रकार नेमका कोणी केला अन त्या मागील कारण नेमकं काय आहे याचा तपास पोलीस घेत आहेत.
मारुती नामदेव उगले असं मृत आढळलेल्या 70 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. ते परळी तालुक्यातील हिवरा गोवर्धन येथील रहिवासी होते. मृत उगले हे 13 जानेवारी रोजी आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाले होते.उगले बेप्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली. पण त्यांचा काहीही थांगपत्ता लागला नाही.
दरम्यान सायंकाळी उशिरा उगले वस्ती जवळील शेतात मारुती उगले यांचा मृतदेह शीर तुटलेल्या अवस्थेत आढळूनआला . परिसरातील एका स्थानिक व्यक्तीने हा मृतदेह पाहिल्यानंतर त्याचा थरकाप उडाला आहे.
या घटनेची माहिती हिवरा गोवर्धन गावात वाऱ्याच्या वेगानं पसरली. यानंतर गावातील अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनास्थळाचा पंचनामा केला असता संबंधित शेतकऱ्याचं मुंडकं गायब असल्याचं पोलिसांना आढळलं.
पोलिसांनी रात्री उशिरा उगले यांचा मृतदेह अंबाजोगाई येथील स्वरातील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच पोलिसांनी आसपासच्या परिसरात मृताचे मुंडके शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अद्याप मुंडकं मिळालं नाही. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला? त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं? याची कोणतीही माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाही. या घटनेचा कसून तपास सिरसाळा पोलीस करत आहेत.