बीड – शिवसेना जिल्हाप्रमुख, भाजप जिल्हाध्यक्ष आणि त्याचा भाऊ यांच्यावरील कारवाईमुळे चर्चेत असलेल्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने बीडच्या माजी नगराध्यक्षाच्या मुलाच्या जुगार अड्यावर छापा घालून नऊ आरोपींना अटक केली.पेठ बीड भागात गेल्या अनेक वर्षांपासून हा जुगाराचा अड्डा सुरू होता मात्र पेठ बीड पोलीस याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत होते.
बीड जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांचे कंबरडे मोडण्याची मोहीम अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी गेल्या काही महिन्यांपासून सुरू केली आहे.केज,अंबाजोगाई, परळी,गेवराई,बीड अशा भागात कुमावत यांनी मटका,गुटखा,वाळू,पत्याचे क्लब यावर छापे घातले. त्यामुळे त्यांच्या पथकाची अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती.
पंकज कुमावत यांच्या पथकाने ज्या ठिकाणी छापा घातला तो जुगाराचा अड्डा पेठ बीड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे.गेल्या अनेक वर्षांपासून हा जुगाराचा धंदा येथे सुरू आहे.मात्र सगळ्यांशी देणंघेणं करून, कधीकधी तोडीपाणी करून हा चौहान याचा हा धंदा सुरू होता.
शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे,भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,मदन मस्के यांच्यावरील कारवाई नंतर तर कुमावत चर्चेचा विषय बनले.दरम्यान सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी बीड शहरात माजी नगराध्यक्ष रणजित सिंह चौहान यांच्या पुत्राचा राणा चौहान याचा जुगाराचा अड्डा उध्वस्त केला.
राणा चौहान याच्या घरासमोर पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याचे समजल्यानंतर कुमावत यांच्या पथकाने छापा घातला .या ठिकाणी तब्बल दीड लाख रुपये रोख,मोबाईल,गाड्या असा ऐवज मिळून आला.पोलिसांनी राणा चौहान व इतर आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.आरोपीमध्ये राणा चौहान शिवाय अशोक सदरे,अमोल मदने,मनोज सौदा,नितीन गुजर ,पंकज शहाणे आणि शैलेश पोहेकर यांचा समावेश आहे.