माजलगाव – मंडळ अधिकार्याची चौकशी करावी असा अर्ज देऊन त्यामध्ये पैशाची तडजोड करून ते स्वीकारत असताना शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष अशोक नामदेवराव नरवडे व त्यांच्यासाठी मध्यस्थी करणार्या पुरवठा विभागाचा नायब तहसीलदार सैदुराम तुकाराम कुंभार (राजे) यांना शुक्रवारी (दि.31) लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने माजलगावात रंगेहाथ पकडले.
शेतीरस्त्यासाठी येथील मंडलाधिकारी हे शेतकर्याला त्रास देत आहेत व पैशांची मागणी करीत आहेत अशा प्रकारची तक्रार अशोक नरवडे याने दिली होती. या तक्रारीची चौकशी नायब तहसीलदार (पुरवठा कुंभारराजे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. या प्रकरणात तक्रार मागे घेण्यासाठी कुंभारराजे यांनी मध्यस्ती करून एक लाख रुपयात सेटलमेंट केली.
या प्रकरणी मंडळ अधिकारी यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर कुंभारराजे यांच्या घरी एक लाख रुपयांची लाच घेत असताना कुंभारराजे व अशोक नरवडे यांना उपअधीक्षक भारतकुमार राऊत व त्यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष व नायब तहसीलदार हे लाचलुचपतच्या जाळ्यात सापडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक भारत राऊत, पो.नि.रवींद्र परदेशी, पोलीस अंमलदार सुरेश सांगळे, हनुमान गोरे, श्रीराम गिराम, सुदर्शन निकाळजे, अमोल खरसाडे, चालक अंमलदार गणेश म्हेत्रे यांनी केली.