बीड – आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर जाणार आहेत.कोरोनाची तिसरी लाट दारात उभी असताना डॉक्टर मंडळींनी संपाच हत्यार उपसल्याने राज्य सरकार समोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने उद्या सकाळी 11 वाजल्यापासून संप सुरू करणार आहेत. जोपर्यंत नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भातली तारीख जाहीर होत नाही, तोपर्यंत संप सुरुच ठेवणार असल्याचा मार्डनं इशारा दिलाय. सेंट्रल मार्डन लवकरात लवकर नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भात निर्णय न झाल्यास महाराष्ट्रातील इमर्जन्सी सेवा आणि अतिदक्षता सेवेतील निवासी डॉक्टर्स देखील संपात सहभागी होणार आहेत.
डॉक्टरांनी पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करावे, कोविड इन्सेन्टिव्ह आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उत्तम वसतिगृह सुविधा इत्यादी मागण्या केल्या आहेत. दरम्यान, “शक्रवारी सकाळी 11.30 वाजता उच्च अधिकाऱ्यांनी आम्हाला या विषयावर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात बोलावलं आहे. परंतु, आम्हाला लेखी अश्वासन हवंय, जे अद्याप आम्हाला मिळालं नाही”, असं मार्डचे सदस्य डॉ. अक्षय यादव यांनी म्हटलंय.
“आमची प्राथमिक मागणी म्हणजे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे. दुसरी, संपूर्ण महाराष्ट्रात वसतिगृहांची परिस्थिती चांगली नसल्यामुळे सुधारण्यात यावे. तिसरी, बीएमसी रुग्णालयांच्या निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमधून टीडीएस कापला जाऊ नये. संपूर्ण महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालये कोविड प्रोत्साहन मिळालेले नाही. त्यांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे”, असंही यादव यांनी म्हटलंय.