बीड – एकीकडे जिल्ह्यात मटका,गुटखा,वाळू,पत्याचे क्लब,अवैध दारू असे सगळे प्रकार सुरू आहेत तर दुसरीकडे पंकज कुमावत यांचं पथक गेल्या काही महिन्यांपासून या धंद्यावर कायद्याचा फास आवळत आहेत.हे धंदे जर एवढ्या बिनधास्तपणे जिल्ह्यात सुरू आहेत तर लोकलचे पोलीस आणि एसपी,डीवायएसपी यांचं नेटवर्क नेमकं करतंय काय?असा प्रश्न उपस्थित होत आहे.लोकल पासून ते शुगर पर्यंत सगळ्यांचेच या अवैध धंदे वाल्याना आशीर्वाद आहेत हेच यातून स्पष्ट होते आहे.
भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मालकीच्या जागेत आलिशान असा जुगाराचा अड्डा पंकज कुमावत यांच्या पथकाने उध्वस्त केला .मस्के यांच्यासह 48 आरोपींवर गुन्हा देखील दाखल केला.तब्बल 75 लाखापेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई जवळपास आठ ते दहा तास सुरू होती.
केज उपविभागात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू असलेले पंकज कुमावत यांना जिल्ह्यातील वाळू,मटका,गुटखा,अवैध दारू यांची माहिती मिळते.शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यापासून अनेकांवर कुमावत कारवाई करतात,मग त्या त्या ठिकाणचे लोकल पीआय,डीवायएसपी काय करतात.त्यांना या सगळ्या दोन नंबर वाल्यांकडून हप्ते मिळतात म्हणून ते गप्प आहेत का अशी चर्चा आता होऊ लागली आहे.
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आर राजा हे आल्यापासून कधीही फिल्डवर दिसले नाहीत.नेमकं ते करतात काय,स्थानिक गुन्हे शाखा असो की डीबी अथवा स्थानिक पोलीस हे या धंद्याकड का दुर्लक्ष करतात,जिल्ह्यात कायदा अन सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
कुमावत यांच्या पथकाने आजपर्यंत ज्या कारवाया केल्या त्या पाहता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राजकीय वरदहस्त असलेल्या लोकांचे वाळू,मटका,गुटख्याच्या तस्करीचे धंदे आहेत हे स्पष्ट होते.मग जे नेटवर्क कुमावत यांनी लावले आहे ते एसपी आर राजा यांना लावता येत नाही का?की ते या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देत नाहीत.
राजेंद्र मस्के यांच्या जागेतील क्लब हा गेल्या आठ महिन्यापासून सुरू होता.बीड ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत हा क्लब येतो, मग इतक्या दिवसात एकदाही या ग्रामीण पोलिसांना,तेथील पीआय किंवा त्यांच्या इंटेलिजन्स ला याची माहिती नव्हती का? अन माहिती होती तर मग ग्रामीण पोलीस झोपा काढत होते का?
कुमावत यांनी बीड,गेवराई येथे वाळूच्या कारवाई केल्या,मग तेथील तहसीलदार, पीआय,डीवायएसपी हे का अशा कारवाई करू शकले नाहीत.ज्या भागात अवैध धंदे असतील अन ते जर इतरांनी उध्वस्त केले तर त्या पीआय,डीवायएसपी वर कारवाई केल्याची अनेक उदाहरणे आहेत.मग बीडच्या एसपी नि आतापर्यंत अशा दुर्लक्ष करून डोळेझाक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर का कारवाई केली नाही.नेमकी आर राजा यांची अडचण काय आहे?कोणाच्या दबावाला ते बळी पडत आहेत?अशी एक ना अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
जिल्ह्याचे स्वास्थ्य अबाधित राहावे,कायदा सुव्यवस्था चांगली राहावी म्हणून ज्यांची जबाबदारी आहे ते एसपी जर अशा पध्दतीने कानाडोळा करणार असतील तर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आता त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी जनतेतून होत आहे.