बीड- बीड जिल्हा रुग्णालयात डॉक्टर आणि स्टाफ यांना मारहाणीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.चार दिवसांपूर्वी ब्रदर ला मारहाणीचा प्रकार ताजा असतानाच सोमवारी रात्री पुन्हा एकदा दुसऱ्या ब्रदर ला मारहाण झाली आहे.जिल्हा रुग्णालयात नोकरीवर असलेले सुरक्षा रक्षक आणि पोलीस काय बघ्याची भूमिका घेतात का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
बीड जिल्हा रुग्णालय म्हणजे कोणीही यावे अन दादागिरी करून जावे असा प्रकार झाला आहे.जिल्हा रुग्णालयात प्रशासन कार्यरत आहे की नाही असा प्रश्न पडावा अशा घटना वारंवार घडत आहेत.जिल्हा रुग्णालयात गेल्या महिनाभरात ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याची तिसरी घटना सोमवारी घडली.
चार दिवसांपूर्वी प्रशांत सुकाळे या ब्रदर ला संतोष थोरात आणि सात ते आठ जणांनी मारहाण केली होती.त्यानंतर सोमवारी ड्युटीवर असलेले ब्रदर विश्वंभर अरसुले यांना कोतवाल गल्ली भागातील एक रुग्ण ज्याच्या हाताला गंभीर जखम झाली होती त्याने व त्याच्या मित्राने मारहाण केली.
जिल्हा रुग्णालयात एका खाजगी सुरक्षा रक्षक कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे.या कंपनीने नियुक्त केलेले रक्षक हे सीएस किंवा एसीएस यांचा राउंड असला की पुढे पुढे करतात,नंतर मात्र चहापाणी अन टपरीवर दिसतात.तर आवारात असलेल्या पोलीस चौकीतील पोलीस नेमके कुठे असतात हे त्यांनाच माहीत.
एका महिन्यात तीन तीन कर्मचाऱ्यांना मारहाणीचा प्रकार घडल्यावर सुद्धा सीएस डॉ सुरेश साबळे का गप्प आहेत हे न उलगडणारे कोडे आहे.त्यांच्यावर नेमका कोणाचा दबाव आहे का हे देखील कळायला मार्ग नाही.एकूणच जिल्हा रुग्णालयात मारहाणीचे वाढते प्रकार पाहता प्रशासनाचा वचक राहिला नसल्याचे चित्र दिसत आहे.