मुंबई – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागणीनुसार परळी मतदारसंघातील 13 तलाठी कार्यालये व निवासस्थानांची उभारणी व 7 महत्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरण व सुधारणा कामे यासाठी हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमधून एकूण 29.13 कोटी रुपयांच्या कामांना निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
परळी तालुक्यातील 13 तलाठी कार्यालये व निवासस्थाने त्या-त्या सज्जाच्या ठिकाणी उभारणीच्या कामांसाठी पुरवणी मागण्यांमधून एकूण 3.18 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
त्याचबरोबर परळी व माजलगाव या दोनही मतदारसंघातील महत्वाच्या लवूळ-पात्रुड-गोवर्धन-जीवणापूर या 55 किमी रस्त्याचे रुंदीकरण, सुधारणा व लहान पुलाच्या कामासाठी 4.5 कोटी रुपये त्याचप्रमाणे खोडवा सावरगाव-दैठणा-अंतरवेली रस्त्यासाठी 3 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे अंबाजोगाई ते मांडवा-मांडेखेल-नाथरा-सोनपेठ या रस्त्याच्या सुधारणा कामासाठी 4 कोटी, हिंगणी-आमला-कांनापूर-बोधेगाव-सोनहीवरा या रस्त्याच्या रुंदीकरण, सुधारणा व पुलाच्या कामासाठी 6 कोटी रुपये, टोकवाडी-नागापूर-नागपिंप्री-बोधेगाव या रस्त्याच्या रुंदीकरण, सुधारणा व पुलाच्या कामासाठी मिळून 6 कोटी रुपये आणि अंबाजोगाई-गित्ता-जवळगाव या रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणा कामासाठी 2.45 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
मतदारसंघातील विकासकामांसाठी 29.13 कोटी रुपये निधी मंजूर केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्य शासनाचे आभार मानले आहेत. तसेच या कामांना प्रशासकीय मान्यता मिळवून लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.