बीड – गेल्या तीन चार महिन्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या येथील द्वारकादस मंत्री बँकेचे अध्यक्ष सुभाष सारडा यांच्यासह सर्व संचालक,सीईओ आणि व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.सारडा हे गेल्या काही महिन्यांपासून पोलीस कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी फरार आहेत .त्यात आता वेगवेगळ्या प्रकारचे चार गुन्हे दाखल झाल्याने सारडा अँड कंपनी आणखीनच अडचणीत येण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यात आणि मराठवाड्यात आपल्या शाखांचे जाळे निर्माण करून त्या माध्यमातून सहकार वाढवण्याचा दावा काढणारे सुभाष सारडा यांनी द्वारकदास मंत्री बँकेचा वापर स्वतःसाठी केल्याचे आता हळूहळू समोर येत आहे.
सारडा यांनी बँकेत मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयांचा गडबड घोटाळा केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या.मात्र कधी भाजप तर कधी काँग्रेस यांच्या माध्यमातून सारडा हे कारवाईतून सुटका करत राहिले.
तीन ते चार महिन्यांपूर्वी सारडा यांनी बँकेचा पैसा वेगवेगळ्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरला,तसेच अनेक गैरव्यवहार केल्याचे समोर आले.या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस गुन्हे देखील दाखल झाले.मात्र तेव्हापासून सारडा अँड कंपनी अंडर ग्राउंड होती.
दरम्यान बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुभाष सारडा,23 संचालक,चार शाखा व्यवस्थापक,मुख्य कार्यकारी अधिकारी सोहनी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.या सर्व प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी संतोषवळके हे करत आहेत.
सहकार सम्राट म्हणून मिरवणारे सुभाष सारडा हे या कारवाईमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत.