उस्मानाबाद – राज्यातील वेगवेगळ्या भागात सापडत असलेले ओमीक्रोन चे रुग्ण मराठवाडा भागात देखील सापडू लागले आहेत.लातूर पाठोपाठ आता बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या उस्मानाबाद येथे देखील या व्हेरियंट चे दोन रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.जिल्हा वासीयांनी त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे .राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 32 वर पोहोचली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे.
युएईहुन बावी येथे आलेला रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे बावीत कलम 144 लागू करण्यात आले आहे. शारजा,युएई (संयुक्त अरब अमिरात) हुन उस्मानाबाद जिल्ह्यात आलेला 42 वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. पण त्याच्या संपर्कात आलेल्या रुग्णाचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
उस्मानाबाद आरोग्य विभागाने 5 नमुने ओमायक्रॉन चाचणीसाठी पाठविले होते त्यापैकी 2 अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आले आहे. बावी येथील तरुण व त्याच्या घरातील एकजण पॉझिटिव्ह आढळला आहे. बावी येथील या तरुणाच्या संपर्कातील आणखी काही जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, मात्र त्यांचा ओमायक्रॉन अहवाल येणे अद्याप बाकी आहे.