बीड – राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने घेतलेल्या गट ड साठीच्या परीक्षेत पेपर फुटी प्रकरणी बीड जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यासह अंबाजोगाई येथील मनोरुग्णालयातील एक डॉक्टर, बीडचा एक शिक्षक आणि भूमीच्या ग्रामीण रुग्णालयातील सहाय्यक अधीक्षक यासह पाच जणांना अटक केली आहे.पेपरफुटी प्रकरण बीडपर्यंत येऊन पोहचल्याने अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या गट ड च्या परीक्षांमध्ये पेपर फुटीचा प्रकार उघडकीस आला होता.या प्रकरणात आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कोरेगावकर यांनी पुणे सायबर सेलकडे तक्रार दिली होती.त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणात जालना येथून एकाला तर मुंबई डॉकयार्ड,औरंगाबाद येथून दोघांना तसेच नांदेड येथून देखील दोघांना अटक केली होती.
या सर्वांनी परीक्षेच्या पेपरमधील 92 प्रश्न फोडत तब्बल सहा ते सातलाख रुपये याप्रमाणे विक्री केली होती.या प्रकरणी जालना येथुन एका आरोपीला अटक केल्यानंतर मोठे रॅकेट उघडकीस आले होते. या रॅकेटचे धागेदोरे बीडपर्यंत पोहचले असल्याचे तपासात निष्पन्न झाले .
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील मनोरुग्ण विभागात नोकरीस असलेला डॉक्टर संदिप जोगदंड रा एकात्मता कॉलनी,अंबाजोगाई, आरोग्य विभागातील प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे रा योगेश्वरी नागरी अंबाजोगाई,उद्धव नागरगोजे, रा तींतरवणी ,शाम मस्के,रा पंचशील नगर अंबाजोगाई,राजेंद्र सानप रा शाम नगर बीड या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे .
यातील डॉ जोगदंड हा अंबाजोगाई मनोरुग्ण विभागात तर मस्के हा बीडच्या जिल्हा रुग्णालयात आणि सानप हा भूम येथील ग्रामीण रुग्णालयात सहायक अधीक्षक म्हणून नोकरीस आहेत .उद्धव नागरगोजे हा जिल्हा परिषद शिक्षक आहे .
आरोग्य खात्यात नोकरी करत असल्यामुळे या सर्वांनी एकत्र येत लाखो रुपयांची कमाई करत पेपर फोडण्याचा उदयोग केला.मात्र आता पोलिसांच्या बेड्या पडल्याने मोठं मोठे मासे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.