अंबाजोगाई – मराठवाडयातील नावाजलेल्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज अन रुग्णालयासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने एमआरआय मशीन मंजूर केली.मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरण यांच्या आडमुठ्या धोरणामुळे पंधरा दिवस झाले तरी मशीन सुरू होऊ शकलेली नाही.धनुभाऊ तुम्ही लक्ष घाला अन अशा झारीतल्या शुक्राचार्यांना त्यांची जागा दाखवा तेव्हाच रुग्णसेवेचा आपला हेतू साध्य होईल .
गेल्या वर्षी सुरू झालेल्या कोरोनाच्या काळात बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी म्हणून पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विशेष प्रयत्न केले.जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण रुग्णालयात आणि जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट असो की नवीन रुग्णवाहिका प्रत्येक कामासाठी मुंडे यांनी विशेष प्रयत्न केले.
अंबाजोगाई येथील विषाणू परीक्षण शाळेवर अतिरिक्त भार येऊ लागल्याने बीडला नवी प्रयोगशाळा मंजूर केली.त्यानंतर अंबाजोगाई येथील एस आर टि रुग्णालयासाठी तब्बल सोळा कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची एमआरआय मशीन मंजूर केली.फिलिप्स कंपनीने पंधरा दिवसांपूर्वी मशीन आणली .
मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने एक्स्प्रेस फिडर ते ट्रान्सफॉर्मर पर्यंत जे काम करावयाचे आहे त्याचे इस्टीमेट देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे.तसेच एस आर टी मधील क्लार्क रवी जाधव याने देखील कामात टाळाटाळ सुरू केल्याने मशीन येऊन सुद्धा सुरू होऊ शकलेली नाही .
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अंबाजोगाई येथील अभियंता सिरसाळकर आणि एस आर टी चा क्लार्क जाधव या दोन झारीतल्या शुक्राचार्यांमुळे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जात आहे.
कोट्यवधी रुपये खर्चून आणलेली एमआरआय मशीन केवळ कागदी घोडे नाचवण्याच्या नादात बंद आहे.ही मशीन तातडीने सुरू झाल्यास रुग्णांना बाहेरून एमआरआय करण्यासाठी लागणारा हजारो रुपयांचा खर्च वाचणार आहे.त्यामुळे धनुभाऊ तुम्ही लक्ष घाला अन कागदी घोडे नाचवून काम लांबवणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवा .
धनुभाऊ एस आर टी रुग्णालयाकडे तीन कोटीच्या आसपास वीजबिल बाकी आहे त्यामुळे महावितरण ने नवीन कनेक्शन आणि 400 केव्ही चा अतिरिक्त लोड देण्यास नकार दिला आहे,या गोष्टीत देखील लक्ष घावणे गरजेचे आहे.