बीड – बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या परळी वैद्यनाथ येथील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्स ने उडवून देण्याच्या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.भावकीच्या वादातून नांदेड येथील काही जणांनी खोडसळपणे हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.पोलीस अधिक तपास करीत आहेत.
12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथ देवल समितीचे विश्वस्त यांना आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाट देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया व गावठी पिस्तूलधारक आहे. मला तातडीची गरज भागविण्यासाठी ५० लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी वैद्यनाथ मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवीन, अशी धमकी असलेल्या कथित ड्रग माफियाने पत्राद्वारे दिली. यामुळे संस्थानच्या तक्रारीवरुन शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
बॉम्ब शोधक व नाशक पथक परळीत दाखल
शुक्रवारी वैद्यनाथ मंदिर सचिव राजेश देशमुख हे मंदिरात आले असताना टपालाद्वारे आलेली पत्रे ते पाहात होते. यातील एक पत्र व्यंकट गुरुपद मठपती (स्वामी) या नावाने आले होते. ते त्यांनी वाचून पाहिले अन् त्यांना धक्काच बसला. रतनसिंग रामसिंग दख्खने, रा. काळेश्वर नगर, विष्णूपुरी, नांदेड या पत्त्यावरुन हे पत्र आले. हे पत्र पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.
धमकीच्या प्रकारचा पोलिसांनी कसून तपास केला. शनिवारी बीड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने मंदिर परिसराची तपासणी केली. श्वानपथकही बोलावण्यात आले होते. पत्रात उल्लेख असलेल्या नावाबाबत पोलिसांनी नांदेड येथे जाऊन दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. एक व्यक्ती विमा प्रतिनिधी असून एकजण बांधकाम व्यावसायिक आहे. दहशतवाद विरोधी पथकाने त्या आरोपींची चौकशी केली असता आमच्यासोबत खोडसाळपणा केला गेला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पुढील दोन दिवसांत आमची कोर्टाची तारीख असून, त्यांच्याशी वाद चालू आहे त्याच व्यक्तींनी आमच्या नावाचा वापर करून पत्र लिहिले असल्याचा आरोपही ताब्यात घेतलेल्या दोघांनी केला आहे. ताब्यात घेतलेल्या लोकांकडून अधिकची माहिती घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.