परळी – भगवंत कणाकणात भरलेला आहे.मात्र काही स्थानांच्या बाबतीत विनाकारण भाविक भक्तांना विक्षेप दर्शवला जातो.बारा ज्योतिर्लिंग स्थानाबाबत काही भागात वेगवेगळे मतप्रवाह व मान्यता असल्याचे दिसते. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थान हे नि:संशय परळी वैजनाथ हेच आहे. आद्य शंकराचार्यांपासुन ते आजपर्यंत सर्वांनी हेच स्थान दिग्दर्शित केलेले आहे.त्यामुळे हा कोणाच्या मान्यतेचा विषयच नाही तरीपण या मुद्यावरून होणारा संभ्रम दुर करण्यासाठी काशीच्या विद्वतसभेत या मुद्द्याची पुनर्मांडणी करणार असल्याची ग्वाही संकेश्वरपिठाधिश शंकराचार्य प.प.अभिनव विद्यानृसिंह स्वामी व अन्य संत-महंतांनी परळीतील धर्मसभेत दिली.
संकेश्वर पिठाचे शंकराचार्य जगद्गुरू प.प.अभिनव विद्यानृसिंह स्वामी महाराज, दंडीस्वामी प.पु. अमृताश्रम स्वामी महाराज, हिमाचल प्रदेश येथील प.पु.जयदेवआश्रम स्वामी महाराज,स्वामी मधुरानंदजी आदी संत-महंत परळी शहरात दि.१९ रोजी धर्मजागरण हेतू आले होते. या दौऱ्या दरम्यान त्यांनी ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ दर्शन व धर्मप्रेमी नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन अध्यात्मिक मार्गदर्शन व हितगुज केले. विविध धर्मप्रेमी भाविकांनी आयोजित केलेल्या पाद्यपूजा स्विकारल्या.त्याचप्रमाणे ब्राह्मण सभेचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, देशपांडे गल्ली, परळी वैजनाथ येथे सदीच्छा भेट देऊन पुजा व दर्शन घेतले.यावेळी झालेल्या धर्मसभेत आशिर्वचनपर मार्गदर्शन झाले.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदू धर्म जागरण कार्यात सक्रिय असलेल्या हिमाचल प्रदेश येथील प.पु.जयदेव आश्रम स्वामी महाराज यांनी उध्वस्त होत चाललेल्या एकत्र कुटुंब संस्थेबाबत चिंता व्यक्त करुन धार्मिक संस्कारांची गरज विषद केली. दंडीस्वामी प.पु. अमृताश्रम स्वामी महाराज यांनी परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग क्षेत्रातील अध्यात्मिक वैभवशाली इतिहास मांडला.त्याचबरोबर बारा ज्योतिर्लिंग स्थानाबाबत काही भागात वेगवेगळे मतप्रवाह व मान्यता असल्याचा मुद्दा मांडला.शंकराचार्यांनी हा संभ्रम दुर करावा अशी समस्त धर्मप्रेमी भाविकांची विज्ञापणा असल्याचे सांगितले. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थान हे नि:संशय परळी वैजनाथ हेच आहे. आद्य शंकराचार्यांपासुन ते आजपर्यंत सर्वांनी हेच स्थान दिग्दर्शित केलेले आहे.त्यामुळे हा कोणाच्या मान्यतेचा विषयच नाही तरीपण या मुद्यावरून होणारा संभ्रम दुर करण्यासाठी काशीच्या विद्वतसभेत या मुद्द्याची पुनर्मांडणी करणार असल्याची ग्वाही संकेश्वरपिठाधिश शंकराचार्य प.प.अभिनव विद्यानृसिंह स्वामी यांनी सांगितले.यावेळी मोठ्या संख्येने धर्मप्रेमी भाविक उपस्थित होते.