परळी -परळी तालुक्यातील टोकवाडी, देशमुख टाकळी तडोळी येथील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या भेटी घेऊन पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी आज त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना धनंजय मुंडे यांनी ते अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेच्या वतीने प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत केली आहे. त्याचबरोबर पांगरी येथील पुरात होऊन मयत झालेल्या ज्ञानोबा शिंदे यांच्या कुटुंबियांचे देखील धनंजय मुंडे यांनी भेटून सांत्वन केले तसेच त्यांना शासनाच्या वतीने 4 लाख रुपयांचा धनादेश यावेळी सुपूर्द करण्यात आला.
परळी तालुक्यातील टोकवाडी येथील नंदकुमार काळे, देशमुख टाकळी येथील नागोराव शिंदे, तडोळी येथील नवनाथ सातभाई या शेतकऱ्यांनी मागील काही दिवसात आत्महत्या केल्या आहेत. या कुटुंबांच्या ना. धनंजय मुंडे यांनी आज भेटी घेऊन त्यांचे सांत्वन केले व प्रत्येकी एक लाखांची मदत केली. यावेळी शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मदतीचीही कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात यावी अशा सूचना ना. मुंडे यांनी उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांना दिल्या. त्याचबरोबर अस्वलांबा येथील ऊसतोड कमागर सागरबाई जाधव यांचा अपघाती मृत्यू झाला होता, जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन ना. मुंडे यांनी जाधव कुटुंबियांना नाथ प्रतिष्ठाण च्या वतीने एक लाख रुपयांची मदत केली आहे.
पांगरी येथील पुरात वाहून मयत झालेल्या ज्ञानोबा शिंदे यांच्या कुटुंबियांची देखील ना. मुंडे यांनी सांत्वनपर भेट घेऊन शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या 4 लाख रुपये मदतीचा धनादेश शिंदे कुटुंबियांना देण्यात आला.