मुंबई – राज्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय महामार्गाच्या भूसंपादन नियमात बदल करण्यात आला आहे,त्यामुळे यापूर्वी मिळणारा चार ते पाच पट जमिनीचा मोबदला आता वीस टक्यानी कमी होणार आहे,या सुधारणेला शेतकऱ्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे .
यानिर्णयानुसार मोबदला गुणक घटक यापूर्वी दोन होता तो आता एक केला आहे. याचबरोबर महामार्गालगतच्या जमिनीच्या मूल्याकंनात 20 टक्के कपात करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे प्रकल्प बाधितांना मिळणाऱ्या मोबदल्यात कपात होणार आहे.
भूसंपादनापोटी मिळणाऱ्या मोबदला मूल्याकनाच्या चार ते पाच पट असेल तर तो आता अडीच पट इतका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ज्या महामार्गाची अधिसूचना यापूर्वी प्रसिद्ध झाली आहे. त्या प्रकल्पांना हा निर्णय लागू होणार नसल्याचे शासनाने म्हटले आहे.
2013च्या भूसंपादन कायद्यानुसार महामार्गासाठी जमिनींचे संपादन करताना शेतकऱ्यांना मूल्याकंनाच्या चार पट मोबदला मिळत आहे. भूसंपादनापोटी मिळणारी रक्कम ही जादा होत होती, असे शासनाचे मत झाले. भूसंपादनापोटी द्याव्या लागणाऱ्या मोबदल्याच्या रकमेमुळे प्रकल्पाचा खर्च वाढत होता.
यासह मध्यंतरी पुण्यात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात भूसंपादनासाठी जादा रक्कम द्यावी लागत असल्याचे सांगितले होते. यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जमिन मोबदल्यापोटी एका एकरला 18 कोटी रुपये मध्यंतरी द्यावे लागल्याचे सांगितले. केंद्र सरकारने सुद्धा भूसंपादनासाठी एवढी रक्कम द्यावी लागत असेल तर राज्यातले रस्ते घेता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
केंद्र सरकारला कोणताही नविन मार्ग प्रस्तावित केला तर तो महाराष्ट्रातूनच जातो. त्यामुळे केंद्र सरकारने भूसंपादनाची रक्कम कमी करावी, अशी सूचना केली होती. यासर्व पार्श्वभूमीवर इतर राज्यांचा विचार करून भूसंपादनासाठी मोबदल्याच्या बाबतीत अंतिम निर्णय घेऊ, असे अजित पवार यांनी सांगितले होते. त्यानुसार महसुल विभागाने याबाबतचा निर्णय घेतला असून त्याचा शासन निर्णयही प्रसिद्ध केला आहे.