मुंबई – राज्यातील शाळा अन मंदिर खुली झाल्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून दररोज किमान पंधरा लाख लोकांचे लसीकरण करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती देत राज्यात या माध्यमातून कवच कुंडल अभियान राबविण्यात येणार आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले .
किमान 15 लाख लसीकरण दररोज झालं पाहिजे. पूर्वी लस उपलब्ध होत नव्हती मात्र आता तशी परिस्थिती नाहीये. आत्ता आपल्याकडे 75 लाख लसींचे डोस उपलब्ध आहेत. 25 लाख आणखी उपलब्ध होतील आणि अशाप्रकारे 1 कोटी लस या क्षणाला उपलब्ध आहेत.
त्यामुळे सहा दिवसांत हा स्टॉक पूर्ण संपवण्याचं उद्दिष्ट आरोग्य विभागाला आम्ही दिलं आहे असंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं. राजेश टोपे यांनी पुढे म्हटलं, जवळपास 100% राज्य अनलॉक होऊन सुरू झालेला आहे. लसीकरण केलं तर सीरिअस रुग्ण वाढणार नाहीत. लसीकरणाचं महत्व सर्वांनी जपावं.
काही विशेष समाजाचे प्रवर्ग आहेत त्यांच्या मौलाविना धर्मगुरून यात एकत्र येऊन लसीकरण करायचं आहे. महाराष्ट्रात लसीकरणाच्या संदर्भात असलेला आपला उच्चांक आपणच मोडला पाहिजे. लसीकरण केल्यानंतर कोविड होणारच नाही असं नाही. दसरा आणि दिवाळी या सणांदरम्यान त्याचा काही परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.
त्याची पूर्वतयारी म्हणून हे लसीकरण घेत आहोत. म्युकरमायकोसीसने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मिळणार 50 हजार सानुग्रह अनुदान देणार आहोत. दसरा, दिवाळी हिंदु धर्मातील मोठा सण आहे. त्यानंतर कोरोना वाढेल का याबाबत शंका व्यक्त केली जातेय. नगरमध्ये आम्ही विशेष लक्ष देत आहोत, लसीकरण वाढवतोय, चाचण्या वाढवाव्या असेही सांगितलं आहे. नगरमध्येही कोविडची स्थिती नियंत्रणात येईल असंही राजेश टोपेंनी म्हटलं.