बीड – बहुप्रतिक्षित नगर बीड परळी रेल्वे मार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी आता बीड जिल्हावासीयांनी आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे .दसऱ्यानंतर याबाबतीत एक व्यापक बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल अशी माहिती बाळासाहेब राख यांनी दिली आहे .
स्व केशरकाकू क्षीरसागर, स्व गोपीनाथ मुंडे, माजी खा जयसिंग राव गायकवाड पाटील,खा राजनीताई पाटील यांच्यापासून ते विद्यमान खा प्रीतम मुंडे या सर्वांनी नगर बीड परळी या रेल्वे मार्गासाठी केंद्र आणि राज्य पातळीवर प्रयत्न केले .
गेल्या चाळीस वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे .जनता अनेकवेळा रस्त्यावर उतरली, मात्र अद्यापपर्यंत हा मार्ग पूर्ण होऊ शकलेला नाही .रेल्वेचे जाळे नसल्याने बीड अजूनही मागास आहे .जिल्ह्याच्या प्रगतीसाठी हा मार्ग लवकरात लवकर होणे आवश्यक आहे .
राज्य आणि केंद्र शासनाने पन्नास पन्नास टक्के निधीचा वाटा उचलण्याची तयारी दाखवली आहे,मात्र तरीही हा मार्ग अद्याप पूर्ण होऊ शकेलेला नाही .त्यामुळे आता या मार्गासाठी लोकांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची गरज आहे .यासाठी विजयादशमी नंतर आंदोलन करण्यात येणार आहे,याबाबत लवकरच एक व्यापक बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल अशी माहिती बाळासाहेब राख यांनी दिली .