मुंबई – बीड जिल्ह्यात निसर्गाची अवकृपा झाल्याने तब्बल सात लाख हेक्टर पेक्षा अधिक शेतीचे नुकसान झाले आहे,याबाबत अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे .
“यावर्षी बीड जिल्ह्यात विशेषकरून ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात सरारीपेक्षा तिप्पट हून अधिक पाऊस झाला आहे. जून ते आजपर्यंत जिल्ह्यात 11 वेळा अतिवृष्टी झाली आहे; तर मागील पंधरा दिवसात जिल्ह्यात तीनवेळा ढगफुटी सदृश अतिवृष्टी कोसळली आहे व ही परिस्थिती आणि पावसाचा जोर अद्यापही विसावलेला नाही. जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 973 मी.मी. पाऊस पडला आहे.
बीड जिल्ह्यातील बाधित 61 महसुली मंडळांमध्ये एकूण 7 लाख 73 हजार हेक्टर लागवड क्षेत्रापैकी 5 लाख 25 हजार हेक्टर शेती अतिवृष्टीने बाधित झाली असून, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, बाजरी यांसह ऊस फळपिके अशा सर्वच पिकांचे सरसकट नुकसान झाले असून यावर्षी शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागण्याचे चिन्ह नाही! जिल्ह्यातील शेतकरी या नैसर्गिक संकटाने खूप मोठ्या संकटात सापडला आहे.
कच्ची घरे, पक्की घरे, झोपड्या यांचीही बऱ्याच ठिकाणी मोठी पडझड झाली असून 500 पेक्षा अधिक दुभती जनावरे वाहून गेली आहेत. विशेषकरून नदीकाठच्या गावांमध्ये आतापर्यंत सुमारे 167 किमी रस्ते तुटून किंवा वाहून गेले आहेत. तर गेवराई, अंबाजोगाई, परळी सह काही तालुक्यातील पूल तुटले किंवा वाहून गेले अशीही जवळपास 16 उदाहरणे आहेत.
महसुली पंचनामे व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील आकडेवारी अभ्यासली असता बीड जिल्ह्यातील ओला दुष्काळ सदृश परिस्थिती किती भीषण व गंभीर आहे, हे लक्षात येईल. या परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी वर्गाला, सर्व सामान्य नागरिकांना धीर, दिलासा व विशेष अर्थसहाय्य देण्याची गरज आहे.
आपले महाविकास आघाडीचे सरकार आपल्या नेतृत्वात बीड जिल्ह्यातील शेतकरी व सामान्य नागरिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील असा मला विश्वास आहे. तरी आपणास नम्र विनंती की या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करत बीड जिल्ह्याला विशेष आर्थिक पॅकेज घोषित करून ते तातडीने लागू करण्यात यावे व नुकसानग्रस्त शेतकरी, कष्टकरी व नागरिकांना अर्थसहाय्य देण्यासाठी संबंधितांना आदेश व्हावेत.”
असे धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या सोबत यासंबंधी सकारात्मक चर्चा झाली असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.