बीड / पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून सकाळी सुरू झालेल्या अतिवृष्टी नुकसान पाहणीचा दौरा दुपारनंतर गेवराई, बीड व शेवटी वडवणी तालुक्यात पोहचला. कुठे चिखल तुडवत तर कुठे बैलगाडीतून पालकमंत्री धनंजय मुंडे हे शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधांवर पोहचले.
गेवराई, बीड, वडवणी आदी तालुक्यात शेतीच्या पिकांचे, फळबागांचे, तुरळक ठिकाणी घरांचे तसेच रस्ते आदींच्या झालेल्या नुकसानीची स्थळ पाहणी करून ना. मुंडे यांनी महसूल, कृषी व पीक विमा कंपनीने संयुक्त पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. तसेच घरांची पडझड झालेल्या नागरिकांना तातडीने राशन आदी आवश्यक सामग्री उपलब्ध करून देण्यात यावी व नुकसानीचे अहवाल सादर करावेत अशा सूचना संबंधित तहसीलदारांना केल्या आहेत.

गेवराई तालुक्यात तलवाडा, रामनगर आदी ठिकाणी नुकसानीची पाहणी करत असताना काही ठिकाणी फळबागांचे देखील मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले तसेच शेतातील माती खरडून वाहुन गेली असल्याने नुकसानीचे स्वरूप मोठे आहे, अशा शेतकऱ्यांच्या पिकासह जमिनीच्या नुकसानीचाही समावेश पंचनाम्यांमध्ये व्हावा अशी सूचना माजी आ. अमरसिंह पंडित यांनी केली, यावेळी मातीच्या नुकसानीचाही विचार पंचनाम्यात करावा असे निर्देश ना. मुंडेंनी दिले.

बीड तालुक्यातील घाटसावळी, बक्करवाडी, पोखरी या भागात पाहणी करत असताना नर्सरीतली पूर्ण झाडे वाहून गेल्याचे तर काही ठिकाणी घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याचे निष्पन्न झाले. घरांची पडझड झालेल्या नागरिकांना राशन व अन्य दिलासदायी आवश्यक साहित्य तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे तसेच त्यांच्या घरांच्या पुन्हा उभारणीच्या कार्यात शासनाकडून अनुदान स्वरूपात मदत व्हावी अशी मागणी आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी केली. त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश ना. मुंडेंनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
वडवणी तालुक्यात चिंचवण शिवारातील सोयाबीन शेतात पाणी साचून व पूर्णपणे वाहून गेल्याने पीक 100%च्या घरात नुकसानीत आहे. मात्र अतिवृष्टी घोषित करण्याचा 65 मिमी पावसाच्या नोंदीचा नियम आडवा येऊन शेतकऱ्यांचे पुन्हा आर्थिक नुकसान होऊ शकते, त्यामुळे डोंगर पट्ट्यात निकषाच्या कमी अधिक पावसाने मात्र नुकसान झाले असेल तिथे सरसकट मदत देण्याबाबत आदेश द्यावेत अशी मागणी ज्येष्ठ नेते आ. प्रकाश दादा सोळंके यांनी केली.

या दौऱ्यादरम्यान स्थानिक पदाधिकाऱ्यांसह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात 15 ऑगस्ट पर्यंत कोरड्या दुष्काळामुळे पिके करपतील अशी परिस्थिती दिसत असताना, 25 ते 30 दिवसांची उघडीप घेतलेला पाऊस अचानक परत आला. अगदी एक दोन दिवसातच मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पाऊस झाला व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. निसर्गाने एकाच हंगामात दोन वेळा धोका दिल्याने शेतकरी संकटात सापडला असला तरी त्यांनी खचून जाऊ नये; राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पूर्ण पणे पाठीशी असून, नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल असा विश्वास ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.