रत्नागिरी – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं एक पथक कोकणाकडे रवाना झालं होतं.
त्यानंतर नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, रत्नागिरी न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, अमित शहा यांनी फोनवरून नारायण राणेंना त्यांच्या बरोबर असल्याचे सांगत मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी काल मुख्यमंत्र्यांवर टीका करताना, खळबळजनक विधान केल्याचं समोर आलं होतं. विशेष म्हणजे भर पत्रकारपरिषदेत राणेंकडून असं विधान करण्यात आल्याने, सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे यांनी हे विधान केलं आहे. रायगडमधील महाड येथे केंद्रीयमंत्री राणेंची जन आशीर्वाद यात्रा पोहचली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना राणेंकडून असं खळबळजनक विधान करण्यात आलं आहे. “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून. अरे हिरक मोहत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती.” असं राणे म्हणाले होते. या पत्रकारपरिषदेस विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची देखील उपस्थिती होती.